स्वातंत्र्यदिनी शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे तोंड होणार पुरणपोळीने गोड,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:40 AM2021-08-15T04:40:36+5:302021-08-15T04:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे विठ्ठल सायन्ना (सामान्य) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना घरगुती जेवणाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे विठ्ठल सायन्ना (सामान्य) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना घरगुती जेवणाचा आस्वाद घेता यावा आणि स्वातंत्र्यदिनी त्या सर्वांचे तोंड गोड व्हावे, यासाठी रुग्णालय प्रशासन आणि राजर्षी शाहू महाराज नागरी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना जेवणात पुरणपोळी देऊन त्यांचे तोंड गोड केले जाणार आहे.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोविड रुग्णालय आहे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना मांसाहारी आणि शाकाहारी जेवण दिले जाते. याशिवाय दूध आणि फळेही दिली जातात. मध्यंतरी रुग्णालयातील सेवानिवृत्त नर्सेसनी रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात नातेवाईकांच्या मदतीने रुग्णांना पिठलं-भाकरी बनवून दिली होती.
रविवारी स्वातंत्र्यदिनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या २५ रुग्णांचे तोंड गोड व्हावे, यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी पुढाकार घेतला आहे. बोईसर येथील राजर्षी शाहू नागरी सेवा संस्थेची साथ त्यांना लाभली आहे. स्वातंत्र्यदिनी रुग्णालयात असलेल्या रुग्णांना पुरणपोळीसह कटाची आमटी, मसाले भात, कोशिंबीर आदी पदार्थांची मेजवानी असणार आहे.
........
"स्वातंत्र्यदिनी रुग्णांना उपचारादरम्यान घरगुती जेवण मिळावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांचे तोंड पुरणपोळीने गोड केले जाणार आहे."
- प्रिया गुरव, आहारतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, ठाणे
..........
वाचली