ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:07 AM2018-08-16T02:07:19+5:302018-08-16T02:07:29+5:30
स्वातंत्र्याचा ७१ वा वर्धापन दिन समारंभ बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते.
ठाणे : स्वातंत्र्याचा ७१ वा वर्धापन दिन समारंभ बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. त्यानंतर, नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमात बोलताना, पालकमंत्र्यांनी शहिदांचा सन्मान योग्य तो व्हावा. तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हातात हात घालून जिल्ह्याचा गतिमान विकास करावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथही दिली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहिली तसेच राजेंद्र तुकाराम गुरव यांना जीवनरक्षा पुरस्कार दिला. त्याचबरोबर २०१७ रोजी नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल मीरा रोडचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांना महासंचालक सन्मानचिन्ह दिले. तर, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि आयसीएसई, सीबीएसई, राष्ट्रीय प्रज्ञा शोध राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले. १३ कोटी वृक्षलागवड महामोहिमेत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, जिल्हा परिषद, कृषी विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग, बदलापूर, अंबरनाथ नगर परिषद, मुरबाड नगरपंचायत यांचादेखील गौरव केला. २१ वयोगटांतील मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्रे दिली. ब्रह्माकुमारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रतिनिधींचादेखील यावेळी गौरव केला.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.
‘युवा माहितीदूत’चा ठाण्यात शुभारंभ
ठाणे : ‘युवा माहितीदूत’ या उपक्र माचा शुभारंभ पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियोजन भवन सभागृहात पार पडला. यावेळी या उपक्र माची व्हिडीओ क्लिप उपस्थितांना दाखवण्यात आली.
उंबरठा’ या मासिकाचे प्रकाशन
ठाणे : ठामपा आवारात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठामपाच्या उंबरठा या मासिकाचे महापौर व पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रकाशन केले. दरम्यान, ठाण्यात प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा संदेश देणारी बुलेट रॅली काढली.
खासदारांचा सत्कार
वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा १५ आॅगस्टनिमित्त राज्य शासनाकडून यावेळी सत्कार केला.
झेडपीत उत्साहात
ठाणे जिल्हा परिषदेच्या आवारात झेडपी अध्यक्षा मंजूषा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आदी उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत ध्वजवंदन
कल्याण : केडीएमसीतर्फे स्वातंत्र्य दिन बुधवारी उत्साहात साजरा झाला. केडीएमसी मुख्यालयात महापौर विनीता राणे व आयुक्त गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
मुख्यालयातील कार्यक्रमप्रसंगी उपायुक्त धनाजी तोरस्कर, विजय पगार, गटनेते दशरथ घाडीगावकर, नगरसेवक प्रकाश पेणकर, मोहन उगले, शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. तर, डोंबिवली विभागीय कार्यालयात उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उपायुक्त सु.रा. पवार उपस्थित होते. डोंबिवली क्रीडासंकुलातील कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकास महापौर राणे व आयुक्त बोडके यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते मंदार हळबे उपस्थित होते.
कल्याण तहसील कार्यालयासमोर तहसीलदार अमित सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात लढा देणाºया १०५ स्वातंत्र्यसेनानींची कोनशिला कल्याण रेल्वेस्थानक परिसरात आहे. या कोनशिलेचा महापालिकेला विसर पडला आहे. तेथे साधी स्वच्छताही केली जात नाही. मात्र, मनसेने बुधवारी तेथे स्वच्छता केली. तसेच हारफुले वाहून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाºयांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी माजी आमदार प्रकाश भोईर, उल्हास भोईर, काका मांडले आदी उपस्थित होते.
कल्याण पूर्वेत पदयात्रा, शिस्तबद्ध संचलन
कोळसेवाडी : स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण पूर्वेत विविध कार्यक्रम झाले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवयित्री गावित, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मधुकर भोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन झाले. याप्रसंगी शांतता समिती, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
चिंचपाड्यातील साकेत महाविद्यालयातर्फे पदयात्रा काढण्यात आली. प्रा. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयापासून केडीएमसीचे ‘ड’ प्रभाग कार्यालय ते पुन्हा महाविद्यालयापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण, सुरक्षा व स्वच्छता अभियानांतर्गत घोषणा दिल्या. काटेमानिवली येथील केडीएमसीच्या शाळेत सहयोग संस्थेचे विजय भोसले यांनी कापडी पिशव्यांचे वाटप केले. यावेळी डॉ. प्रशांत पावशे, अशोक झा, करण थापा, मुख्याध्यापक सुरेश जाधव उपस्थित होते.
कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत तिसगाव जनसंपर्क कार्यालयाजवळ माजी सैनिक लेफ्टनंट कर्नल जी.आर. शर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी युवकांनी तिरंगा एकता बाइक रॅली काढली. सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. तर, नूतन ज्ञानमंदिर विद्यालयात नौदलातील निवृत्त नौसैनिक गणेश कोते यांच्या हस्ते व डॉ. गिरीश लटके, मुख्याध्यापिका पुष्पा गायगरे, सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन झाले.
भाजपाची तिरंगा बाइक रॅली
डोंबिवली : भाजपा डोंबिवली पूर्व मंडलतर्फे बुधवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यात पक्षाचे पूर्वेतील नगरसेवक संदीप पुराणिक, राजन आभाळे, निलेश म्हात्रे, पूर्वमंडल अध्यक्ष संजीव बीडवाडकर, रवीसिंग ठाकूर, बाळा पवार व कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्वामी विवेकानंद रोड, शिव मंदिर, दत्तनगर, संगीतावाडी, मानपाडा रोड, चाररस्ता, टिळक पथ, सावरकर रोड, फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी चौक, डॉ. राथ रोड या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. यावेळी ‘भारतमाता की जय,’ ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देण्यात आल्या.