स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:30 AM2018-01-02T06:30:36+5:302018-01-02T06:30:51+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे.

 Independent Dombivli Municipal Corporation - MNS demand | स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी

स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. त्यामुळे स्वतंत्र डोंबिवली महापालिकेची स्थापना करण्याची मागणी मनसेने केली आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, डोंबिवली शहर साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आहे. डोंबिवलीच्या विकासाबाबत शिवसेना, भाजपाने कायम अन्याय केला आहे. दोन हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवलीचा एकही प्रकल्प घेण्यात आलेला नाही. डोंबिवलीच्या प्रकल्पाचा समावेश करा, अशी मागणी केल्यावर एमएमआरडीए आयुक्तांनी अशा प्रकारे आता समावेश करता येणार नाही, असे सांगितले. डोंबिवली शहरातून महापालिकेच्या तिजोरीत सगळ्यात जास्त महसूल जमा होतो, असा दावा करून हळबे म्हणाले की, तरीही डोंबिवलीतील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. फेरीवाल्यांचे प्रश्न सुटलेले नाही. रस्ते अरुंद आहेत. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सक्षम अधिकारी दिला जात नाही. स्मार्ट सिटीत शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या सिटी पार्कचा समावेश करण्यात आला.
हा समावेश करण्यात एमएमआरडीएला अडचण आली नाही. मग, डोंबिवलीच्या प्रकल्पाचा समावेश करण्यात नेमकी कशी काय अडचण आहे. डोंबिवलीचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात होणार नसल्यास डोंबिवली महापालिकेतून वेगळी करून तिची स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, अशी मागणी हळबे यांनी केली आहे.

२७ गावांचाही समावेश करण्याची सूचना\

कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी एक हजार ८९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एमएमआरडीए कार्यक्षेत्रात असलेल्या महापालिकांच्या लगत असलेल्या गावांच्या विकासाचा प्रश्न अधिक बिकट आहे. त्यांना सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डोंबिवली शहर, २७ गावे, नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेली १४ गावे व ठाणे महापालिकेतील २२ गावे यांची डोंबिवली महापालिका स्थापन केल्यास भौगोलिकदृष्ट्या एकसंधता येऊ शकते.

मनसेचे नेते राजू पाटील यांनी यापूर्वीच अशी मागणी केली होती. मनसेच्या जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी सांगितले की, २७ गावांना स्वतंत्र पालिका हवी आहे. त्यांना महापालिकेत राहायचे नाही. सरकारने डोंबिवली स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास या २७ गावांचे पालकत्व मनसे घेण्यास तयार आहे.

Web Title:  Independent Dombivli Municipal Corporation - MNS demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.