स्वतंत्र महापालिकेसाठी बदलापूरवासी सरसावले
By Admin | Published: January 6, 2016 01:04 AM2016-01-06T01:04:34+5:302016-01-06T01:04:34+5:30
अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका न करता बदलापूरची स्वतंत्र महापालिका करावी, यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे
बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्र महापालिका न करता बदलापूरची स्वतंत्र महापालिका करावी, यासाठी सुरू केलेल्या मोहीमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या मोहीमेत ७,६५० नागरिकांनी स्वतंत्र महापालिकेला कौल दिला असून तशा आशयाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष कालिदास देशमुख यांनी ते निवेदन कोकण आयुक्त तानाजी संत्रे यांना सुपूर्द केले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका एकत्र करून त्यांची एकच महापालिका करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. त्याबाबत अभ्यासासाठी कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही शहरांच्या स्वतंत्र महापालिका करायच्या असतील तर या समितीचा अहवाल महत्त्वाचा आहे. समितीची पहिली बैठक मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. तेथील सर्व अधिकारी आणि कोकण आयुक्तांपर्यंत बदलापुरातील नागरिकांची मागणी पोचविण्यासाठी देशमुख यांनी नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र कोकण आयुक्तांकडे सुपूर्द केले.
या वेळी स्वतंत्र महापालिका कशासाठी हवी, असा प्रश्न आयुक्तांनी विचारला. बदलापूरची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात असून वांगणीसह इतर ग्रामीण भाग बदलापूरला जोडल्यास बदलापूरची स्वतंत्र महापालिका होणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी बदलापूर शहराचा विकास आराखडा नव्याने जाहीर करण्यात येणार आहे. स्वतंत्र महापालिकेचा निर्णय झाल्यास ते गृहीत धरून हा आराखडा तयार करता येईल, असे म्हणणे देशमुख यांनी मांडले. बदलापूर पालिकेची निवडणूक ही अवघ्या सात महिन्यांपूर्वी झाली असून लागलीच महापालिका करुन निवडणूका घेणे योग्य राहणार नाही असेही स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले. जिल्हा सदस्य सेवक देशमुख, शहर उपाध्यक्ष संजय कराळे, दिनेश धुमाळ, सचिव अविनाश देशमुख आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.