टेंभीनाका येथे महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:44 AM2021-09-22T04:44:23+5:302021-09-22T04:44:23+5:30
ठाणे : महिलांना सुलभरीत्या कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी, यासाठी ठामपाने सुरू केलेल्या विशेष लसीकरण सत्राचे उद्घाटन सोमवारी ...
ठाणे : महिलांना सुलभरीत्या कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी, यासाठी ठामपाने सुरू केलेल्या विशेष लसीकरण सत्राचे उद्घाटन सोमवारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते, तसेच महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ठामपा शाळा क्र. १२ टेंभीनाका येथे करण्यात आले.
यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक सुधीर कोकाटे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव आदींची उपस्थिती होती.
अनेक महिला नोकरी, कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर वेळेत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे ठाणे शहरात झालेल्या एकूण लसीकरणात महिलांची आकडेवारी कमी आहे. महिलांना त्यांच्या वेळेनुसार लस घेता येण्यासाठी ठाण्यातील टेंभीनाका येथील शाळा क्र. १२ मध्ये दिवसभर दोन सत्रांत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केल्याचे महापौरांनी सांगितले. इतर ठिकाणीसुद्धा दोन सत्रांत लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही महापौर म्हणाले.
गर्भवतींना प्राधान्याने लस
गर्भवती महिलांना केंद्रावर प्राधान्याने लस दिली जात आहे. ठामपा हद्द क्षेत्रात १२ लाखांचा लसीकरणाचा टप्पा पार करीत आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक, बेघरांसाठी, तृतीयपंथी नागरिकांसाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवून लसीकरण केले.
------------------