एक सदस्यीय निवडणूक पद्धतीत अपक्षांचा होणार बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:07+5:302021-08-27T04:43:07+5:30
अजित मांडके ठाणे : ठाणे, मुंबई आदींसह इतर काही महत्त्वाच्या महापालिकांच्या आगामी निवडणुका या एक सदस्यीय पद्धतीनेच घेतल्या ...
अजित मांडके
ठाणे : ठाणे, मुंबई आदींसह इतर काही महत्त्वाच्या महापालिकांच्या आगामी निवडणुका या एक सदस्यीय पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याने यामध्ये बंडखोरी अधिक होऊन अपक्षांसाठी दारे खुली होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय पद्धतीमुळे एकही अपक्ष निवडून आला नव्हता. परंतु आता एक सदस्यीय पद्धतीमुळे अपक्षांचा भाव तर वधारणार आहेच; शिवाय या निवडणुकीतून पालिकेवर अपक्ष निवडून जाण्याची शक्यतादेखील जास्त दिसत आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने निवडणुकीचा धुरळा आता उडणार आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुका आता सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. परंतु एक प्रभाग पद्धतीने अनेकांचे अवसान गळाले आहे. त्यातही या निवडणुकीत २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आल्याने नव्याने प्रभाग वाढण्याची शक्यता मावळली आहे. २०२१ ची लोकसंख्या गृहीत धरली असती, तर विद्यमान प्रभागांमध्ये सुमारे २५ प्रभागांची भर नव्याने पडली असती. परंतु आता ती आशा फोल ठरली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीत नव्याने प्रभाग वाढणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. सध्या जेवढे १३१ प्रभाग आहेत, त्यानुसारच ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे नव्याने प्रभाग रचनेची वाट पाहणाऱ्या अनेक हवशागवशांचे अवसान गळून पडले आहे. आता प्रभाग रचना कशी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मागील निवडणूक ही चार सदस्यीय पद्धतीने झाल्याने त्याचा फटका अपक्षांना बसला होता. या निवडणुकीत एकही अपक्ष महापालिकेत निवडून गेला नव्हता. परंतु आता एक सदस्यीय पद्धतीमुळे अपक्षांना पुन्हा संधी मिळणार आहे. पक्षाने तिकीट नाकारले तरी, त्याच प्रभागात आपली ताकद आजमावत अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या अपक्षांचा भाव वधारला जाणार असून, त्यांना महापालिकेत निवडून जाण्याची संधी यामुळे मिळणार असल्याचे दिसत आहे. थोडक्यात काय तर, या एक सदस्यीय पद्धतीमुळे अपक्षांना थोपवण्याचे आव्हान विविध पक्षांपुढे असणार आहे.