भारत संरक्षण क्षेत्रात २०२४ पर्यंत आत्मनिर्भर- लेफ्टनंट जनरल कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:01 AM2020-08-16T01:01:48+5:302020-08-16T01:02:06+5:30
भारत २०२४ पर्यंत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा आशावाद १९८४च्या सियाचीन ग्लेशियरवरील आॅपरेशन मेघदूतच्या यशानिमित्त शौर्यचक्र विजेते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
डोंबिवली : भारत २०२४ पर्यंत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होईल, असा आशावाद १९८४च्या सियाचीन ग्लेशियरवरील आॅपरेशन मेघदूतच्या यशानिमित्त शौर्यचक्र विजेते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली शाखेने आॅनलाइनद्वारे आयोजित केलेल्या राष्ट्रपूजन व्याख्यानमालेचा शुभारंभ शुक्रवारी झाला. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित सामर्थ्यशाली संरक्षण व्यूहरचना व्याख्यानमालेचे पहिले पुष्प कुलकर्णी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.
संरक्षण क्षेत्रातील भारताचे स्वावलंबित्व, चीनचे विस्तारवादी धोरण, चीन-पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांकडून सुरू असलेल्या भारतविरोधी कुरापती व त्याला भारतीय सैन्याकडून देण्यात येणारे चोख प्रत्युत्तर, पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन्ही देशांची झालेली कोंडी, अनेक वर्षांत भारताची आर्थिक, संरक्षण, परस्पर मुत्सद्दी या क्षेत्रांत वाढलेली ताकद, भारत-चीनमधील अनेक वर्षे भिजत घोंगडे असलेला सीमाप्रश्न, गलवान खोरे, डोकलाम येथील भारत-चीन संघर्ष यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी विश्लेषण केले.
>संरक्षण उपकरणांच्या उत्पादनातील भारताची प्रगती, मुत्सद्दी परराष्ट्र धोरण आणि भारतीय सैन्याने डोकलाम आणि गलवान खोरे यामध्ये विपरित परिस्थितीतही दाखवलेले शौर्य यांचा त्यांनी उल्लेख केला.