Maharashtra Election 2019 :भारत हिंदू राष्ट्र बनू देणार नाही - ओवेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:55 AM2019-10-15T05:55:52+5:302019-10-15T05:56:02+5:30
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गोविंदवाडी मैदानात ओवेसी यांच्या जाहीर प्रचारसभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.
कल्याण : भारतात अनेक जातीधर्मांचे लोक राहतात. एका जातीधर्माचा हा देश नाही. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही बनणार नाही. यासाठीचे प्रयत्न हाणून पाडून भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही, असे आव्हान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी रा.स्व. संघ व सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी जाहीर सभेत दिले.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गोविंदवाडी मैदानात ओवेसी यांच्या जाहीर प्रचारसभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. संघाच्या सरसंचालकांनी भारतात मुस्लिम खूश आहेत; कारण भारत हिंदू राष्ट्र आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा ओवेसी यांनी समाचार घेतला. भारतात मुस्लिमबांधव खूश आहेत, ही संघाची मेहरबानी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेत आम्हाला जगण्याचे मूलभूत अधिकार दिले आहे. त्यामुळे आम्ही संविधानाच्या जोरावर जिवंत आहोत. या देशात गंगा, यमुना व सिंधू नदीची संस्कृती आहे. भारत धर्मनिरपेक्ष असून, तीच त्याची खरी ओळख आहे. काही लोक त्याला एक धर्म व एका रंगाचा देश करू इच्छित आहेत. त्यांचा हा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. औरंगाबादच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी हिरव्या रंगावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना, भारताच्या राष्ट्रध्वजात हिरवा रंग आहे, याकडे ओवेसी यांनी लक्ष वेधले.
मोदी यांनी मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक प्रतिबंधक कायदा केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या समस्या वाढल्या आहेत. महाराष्ट्रात मराठी समाजाला आरक्षण दिले. मात्र, मुस्लिमांना आर्थिक मागासतत्त्वावर आरक्षण देण्याचा मुद्दा का घेतला नाही, असा सवाल करत मुस्लिमांनाही याआधारे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
चंद्रापेक्षा पृथ्वीवरील खड्ड्यांची चिंता हवी!
भारताच्या चांद्रमोहिमेत चंद्रावर उपग्रह उतरला नाही, याची चिंता मोदींना आहे. मात्र, ठाणे आणि कल्याणच्या रस्त्यावर किती खड्डे पडले आहेत, त्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, याची चिंता त्यांना नाही. चंद्रावरील खड्ड्यांपेक्षा पृथ्वीवरील खड्ड्यांची चिंता त्यांना असली पाहिजे. चंद्रावर उपग्रह पाठवण्याचे तंत्रज्ञान भारताने विकसित केले, ही चांगली गोष्ट असली तरी, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तंत्रज्ञान तुमच्याकडे नाही का, असा सवाल ओवेसी यांनी केला.