विदेशी श्वानांपेक्षा भारतीय श्वानच खरोखर हुश्शार, श्वान अभ्यासकांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:46 AM2020-09-01T02:46:33+5:302020-09-01T02:47:22+5:30
रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी श्वानांपेक्षा देशी श्वान पाळण्याचे आवाहन भारतीय जनतेला केले होते.
ठाणे : विदेशी श्वान हे भारतीय श्वानांपेक्षा आकर्षक, दिसायला चांगले असतात आणि त्यांचा दर्जा चांगला असल्याने भारतीय श्वानप्रेमींचा कल हा विदेशी श्वानांकडेच असतो. सोशल स्टेटस म्हणून श्वान पाळण्याची क्रेझ भारतीयांमध्ये असल्याचे मत श्वान अभ्यासकांनी नोंदविले. विदेशी श्वानांपेक्षा भारतीय श्वान हे अधिक हुशार असतात. मात्र, देशी श्वान म्हणजे ‘रस्त्यावरील कुत्रे’ अशी धारणा असल्याने गोरगरीब देशी श्वान पाळतात. मात्र, त्यांची देखभाल व्यवस्थित ठेवली जात नसल्याने भारतीय श्वानप्रेमी विदेशी श्वानांकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी श्वानांपेक्षा देशी श्वान पाळण्याचे आवाहन भारतीय जनतेला केले. याबाबत श्वानप्रेमींना विचारले असता ते म्हणाले की, विदेशी श्वानांचे आकर्षण असले, तरी देशी श्वान हे चांगलेच असतात. देशी श्वान हे अत्यंत हुशार असतात. त्यांची रोगप्रतिकारक्षमता अधिक असते. त्यांना प्रशिक्षण दिल्यास ते लवकर शिकतात. परंतु, त्यांची देखभाल नीट होत नाही. तसेच, त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र संस्था नसल्याने या श्वानांकडे महानगरांमधील श्वानप्रेमी वळत नसल्याचे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक, श्वान अभ्यासक डॉ. संतोष त्रिपाठी यांनी सांगितले. ज्यांना कुत्रा पाळायचा असतो, ते विदेशी श्वान पाळण्यावरच भर देतात. मोठ्या शहरांतील श्वानप्रेमी विदेशी, तर ग्रामीण भागांतील श्वानप्रेमी देशी श्वानांना पसंती देतात. आवड आणि घराचे क्षेत्रफळ पाहून कोणत्या जातीचे श्वान पाळायचे, हे ठरते. लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड, गोल्डन रिट्रीव्हर, पग या विदेशी जातींच्या श्वानांना भारतीय श्वानप्रेमींची अधिक पसंती आहे, असे पशुउत्पादन व व्यवस्थापन विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सलील हांडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, देशी श्वान पाळले तर खर्च कमी होईल. ते भारतीय वातावरणाशी अनुकूल असल्याने ते लवकर आजारी पडत नाहीत. आपण जे अन्न खातो, तेच अन्नपदार्थ ते खाऊ शकतात. याउलट, विदेशी श्वानांचे अन्न, त्यांची किंमत, वैद्यकीय खर्च बराच असल्याने त्यांना पाळणे खर्चिक असते. विदेशी श्वानांचे केस हे देशी श्वानांपेक्षा अधिक लांब असल्याने त्यांच्या देखभालीचा खर्च असतो. विदेशी श्वान रेडिमेड फूडवर अवलंबून असतात. काही विदेशी श्वान घरी शिजवलेले अन्न खाऊ शकतात.
डॉग शोमध्ये एखाद्या श्वानाचा वरचा क्रमांक आला असेल, तर त्या श्वानाच्या पिलांना अधिक मागणी असते. कोणतेही श्वान खरेदी करताना श्वानप्रेमी हे त्यांची वंशावळ तपासतात, असेही डॉ. हांडे म्हणाले. रस्त्यावर फिरणारे श्वान, हीच श्वानांची देशी जात आहे. परंतु, देशी जाती अजूनही श्वानप्रेमींनी पाहिल्या नसल्याने, त्यांना माहीत नसतात. आपल्याकडे चांगल्या जातीचे देशी श्वान आहेत, पण फारसे कुणी त्यांची माहिती घेण्याच्या भानगडीत पडत नाही.
डॉग शोमध्ये विदेशी श्वानांचाच सहभाग अधिक असतो. त्या श्वानांचे जे सांभाळकर्ते असतात, त्यांनाच जास्त हौस असते. भारतीय श्वानांसाठी डॉग शो होत नाही. इंडियन नॅशनल केनल क्लब हे जास्त विदेशी श्वानांचे रेकॉर्ड ठेवतात. आपल्याकडे देशी श्वानांच्या जातीचे रेकॉर्ड ठेवले जात नाही. देशी श्वानांसाठी संस्था उभी राहिली, तर भारतीय श्वानांना चांगले दिवस येतील, असे डॉ. त्रिपाठी म्हणाले.
विदेशी श्वानांचे प्रकार
वर्किंग, स्पोर्ट्स आणि टॉय असे श्वानांचे प्रकार आहेत. वर्किंग डॉग हे मोठ्या ब्रीडचे, स्पोर्ट्स डॉग हे मध्यम ब्रीड, तर टॉय डॉग हे लहान ब्रीडचे असतात.
अनेक महिलांनाही श्वान पाळायला आवडतात. पुडल्स, चिहुआ अशा छोट्या ब्रीडना त्यांची अधिक पसंती असते.
देशी श्वानांच्या जाती : चिप्पीपराय, मुधोल हाउंड, राजपालायम, भारतीय स्पीट्झ, कन्नी, गड्डी, थाकरवाल, रामपूर ग्रेहाउंड.
अन्य विदेशी जाती जर्मन शेफर्ड, ग्रेटडेन, लॅब्राडॉर, पग, गोल्डन रिट्रीव्हर, कॉकर स्पॅनियल, सेंट बेनॉर्ड, डॉबरमन, डालमेशन, बॉर्डर कोली, सायबेरियन हस्की, सेत्झू, पामेरियन, मिनीएचर पिचर.