इस्रायली विद्यार्थी करताहेत भारतीय शिक्षणपद्धतीचा अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:03 AM2018-08-25T00:03:27+5:302018-08-25T06:53:26+5:30
भारतातील प्राथमिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास व येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी इस्त्राईली विद्यार्थी वाड्यात आले आहेत.
वाडा : भारतातील प्राथमिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास व येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी इस्त्राईली विद्यार्थी वाड्यात आले आहेत. त्यांनी शहरातील वाडा शाळा नंबर १ ही शाळा त्यासाठी निवडली असून या शाळेत ते विद्यार्थांना शिक्षण देत असून स्वत:ही भारतीय प्राथमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करीत आहेत. त्याचबरोबर येथील संस्कृतीही ते जाणून घेत आहेत.
इस्त्राईल सरकार दरवर्षी नवनवीन देशात तेथील विद्यार्थांना पाठवून त्या त्या देशाच्या प्राथमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करीत असते. तसेच तेथील संस्कृतीही जाणून घेत असते. यावर्षी त्यांनी भारत देश निवडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हे विद्यार्थी वाड्यात असून सर्वप्रथम त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शाळेची किरकोळ दुरूस्ती केल्यानंतर त्यांनी शाळेला रंगरंगोटी द्यायचे काम सुरू केले आहे. एकूण ३९ विद्यार्थ्यांचे पथक येथे आले असून या विद्यार्थांनी आठ- आठ विद्यार्थांचे गट बनविले आहेत. इस्त्राईली विद्यार्थीच्या पथकाचे नेतृत्व लिओनट्युन, आॅलॉन, लिरॉन हे करीत आहेत.
तेही शिकतात अन विद्यार्थ्यांनाही शिकवतात
काही विद्यार्थी शाळेची रंगरंगोटी करीत आहेत. तर काही येथील विद्यार्थांना इस्त्राईली शिक्षण देत आहेत. येथील भाषा त्यांना अवगत नसल्याने त्यांनी दुभाषिक ठेवले आहेत. ते त्यांच्या भाषेत बोलतात त्यानंतर त्याचे भाषांतर करून विद्यार्थांना सांगितले जाते. तेही येथील विद्यार्थी शिक्षकांकडून येथील शिक्षण पद्धत जाणून घेत आहेत. ते शिकवताना गाऊन नाच करून शिकवत असल्याने विद्यार्र्थांं मध्येही उत्साह निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नेहमीच गैरहजर राहणारे विद्यार्थी वर्गात दिसत आहेत.