इंटक काँग्रेस फेरीवाल्यांच्या पाठीशी उभी राहणार - सचिन शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 01:27 PM2019-06-28T13:27:45+5:302019-06-28T13:32:53+5:30
ठाण्यातील फेरीवाल्यांवर होत असलेल्या सरसकट कारवाईबाबत इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे - ठाण्यातील फेरीवाल्यांवर होत असलेल्या सरसकट कारवाईबाबत इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
इंटक काँग्रेस केवळ संघटित कामगारच नव्हे तर असंघटित कामगारांच्या मागेही तेवढ्याच ताकदीने उभी आहे. गेली अनेक वर्षे ठेले-हातगड्यांवर खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या फेरीवाल्यांच्या पाठीशी इंटक उभी आहे, त्यामुळे बेकायदेशीरपणे त्यांच्यावर कारवाई करणे ठाणे महापालिकेने थांबवावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व महानगरपालिकांनी फेरीवाला धोरण राबवणे बंधनकारक आहे. ठाणे महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण तर केले, पण त्यांच्या जागा अद्याप निश्चित केल्या नाहीत, त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे शहरातील अस्तित्वात असलेल्या फेरीवाल्यांपेक्षा खूप कमी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे.त्यामुळे एखाद्याला डावलून त्याचा उपजीविकेचा अधिकार पालिका काढून घेऊ शकत नाही, असेही शिंदे यांनी ठणकावले आहे.
महापालिकेने आधी जागा निश्चिती करावी नंतरच कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी सचिन शिंदे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. इंटक काँग्रेस ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली संघटना आहे. अन्यायकारक कारवाईच्या विरोधात ही संघटना नेहमीच असंघटित कामगारांच्या पाठीशी उभी राहील तसेच त्यांच्या मूलभूत सुविधांसाठीही लढा देईल,असा इशाराही शिंदे यांनी शेवटी दिला आहे.