अवकाळी पावसाचे त्यांनी आधीच दिले होते संकेत...
By admin | Published: March 18, 2017 03:46 AM2017-03-18T03:46:43+5:302017-03-18T03:46:43+5:30
राज्यात अवकाळी पाऊस होणार याची पूर्वसूचना आपण आधीच दिल्याचा दावा ठाण्यातील शेखर साळगावकर यांनी केला आहे. साळगावकर हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.
ठाणे : राज्यात अवकाळी पाऊस होणार याची पूर्वसूचना आपण आधीच दिल्याचा दावा ठाण्यातील शेखर साळगावकर यांनी केला आहे. साळगावकर हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. हे भाकित वर्तवतानाच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेला मोठा अपघात होणार असल्याचे भविष्यही त्यांनी वर्तवले आहे. मात्र, हा अपघात नेमका कुठे होणार, हे ठिकाण अद्याप त्यांनी जाहीर केलेले नाही. ते लवकरच सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अवकाळी पावसाच्या आपल्या भाकिताबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनादेखील कल्पना दिली होती. मात्र, त्यांनी याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यानेच राज्यात सात लाख हेक्टरावरील पिकाचे नुकसान झाले. काही बळी गेले. गांभीर्याने दखल घेतली असती तर कदाचित हे नुकसान काही प्रमाणात तरी कमी करता आले असते असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपासून राज्यातील यवतमाळ, नागपूर, लातूर, पंढरपूर आदी ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पावसाबाबतचे हे भविष्य आठवडाभर आधीच वर्तवल्याचे ते म्हणाले. शिवाय, साळगावकर यांच्या फेसबुक पेजवर देखील त्याचा उल्लेख असल्याचे ते सांगतात.
२०१७ मध्ये राज्यात समाधानकारक पाऊस पडणार असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमी असेल असेही त्यांनी सांगितले. जूनमध्ये तुरळक पाऊस पडणार असून जुलैच्या दुसऱ्या आठड्यापासून पाऊस चांगली हजेरी लावेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. (प्रतिनिधी)
- येत्या मे अखेर म्हणजेच शेवटच्या आठवड्यात रेल्वेला मोठा अपघात होणार असल्याचेही भविष्य त्यांनी वर्तविले आहे. परंतु,हा अपघात कुठे होणार याची कल्पना मात्र त्यांनी दिलेली नाही. ती लवकरच दिली जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.