इंदोरीकरांवरील गुन्ह्याच्या मागणीसाठी वंचित आघाडीचे ठाण्यात बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:52 PM2020-03-05T19:52:51+5:302020-03-05T19:58:41+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इंदोरीकर आरक्षणावरून दिशाभूल करणारे कीर्तन करीत असल्याचा या उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. शिवीगाळ केल्याच्या आरोपासह कीर्तनातील इंदोरीकर यांच्या विधानामुळे जातीजातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे
ठाणे : भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी आणि चर्मकार समाज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लेखी फिर्याद करून सहा दिवसांनंतरही ह.भ.प. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे आणि अॅड. राजय गायकवाड यांनी गुरुवारपासून ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इंदोरीकर आरक्षणावरून दिशाभूल करणारे कीर्तन करीत असल्याचा या उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. शिवीगाळ केल्याच्या आरोपासह कीर्तनातील इंदोरीकर यांच्या विधानामुळे जातीजातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चिथावणीखोर कीर्तनातील वक्तव्याविरोधात चव्हाण यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याददेखील दाखल केलेली आहे. यासंदर्भात चौकशी करून दोन दिवसांत अॅट्रॉसिटी, संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्तांनी २९ फेब्रुवारीला दिले होते. मात्र, सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या निषेधार्थ हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा इंदोरीकर प्रसारमाध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
..........