शहापूर तालुक्यात प्रथमच इंद्रायणी भात शेतीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:16 AM2021-02-18T05:16:03+5:302021-02-18T05:16:03+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील आवरे या गावामध्ये इंद्रायणी या भातपिकाच्या लागवडीचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. हा प्रयोग ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील आवरे या गावामध्ये इंद्रायणी या भातपिकाच्या लागवडीचा अभिनव उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तालुक्यात सर्वत्र राबविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
तालुक्यामध्ये इंद्रायणी या नवीन भातबियाण्याची प्रथमच ओलिताखाली असणाऱ्या आवरे या गावाची निवड करून लागवड करण्यात आली आहे. या प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. इंद्रायणी या भातपिकामुळे अतिशय कमी वेळामध्ये आणि केवळ बेड पद्धतीने या पिकांची लागवड केल्याने एकाचवेळी बियाणे पेरण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, मजुरी वाचून खर्च कमी होतो, अधिक उत्पादन मिळते व वारंवार जमीन उखळावी लागत नसल्याने जमिनीचा पोत कमी होत नाही. सुपीकता कायम राहत असल्याने भातबियाणे अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.
तालुक्यातील आवरे गावातील ३५ शेतकऱ्यांना ४०० किलो भातबियाण्यांचे वाटप केवळ प्रायोजित पद्धतीने करण्यात आले असून त्यासाठीचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे किमान ३५ एकर जमिनीत हे पीक घेण्यात येत आहे. हा पिकविलेला भात २५ रुपये किलो दराने विकत घेण्यात येणार असून यासाठी गावातील शेतकरी रोहित घरत हे शेतकऱ्यांना या पिकासाठी प्रोत्साहित करीत आहेत. ९० ते ९५ दिवसांचे हे पीक असून ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.