वीजपुरवठ्याअभावी उद्योग, शिक्षण अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:31+5:302021-07-30T04:41:31+5:30
ठाणे : मागील काही दिवस ठाण्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने उद्योग, व्यवसाय, ऑनलाइन ...
ठाणे : मागील काही दिवस ठाण्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने उद्योग, व्यवसाय, ऑनलाइन अभ्यास तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. एकीकडे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले दिली जात असताना, दुसरीकडे नियमित वीजपुरवठा केला जात नाही. त्यातच बिल न भरल्याने महावितरणने मनोरुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला होता. याविरोधात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आंदोलन करताच मनोरुग्णालयाचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. परंतु एकूणच वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोना काळात निर्बंधांमध्ये सुरू असलेल्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर अनियमित पुरवठ्याचा परिणाम उद्योग, व्यवसायावर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, गृहिणींच्या घरगुती कामात व्यत्यय येत आहे. सध्या जे उद्योग-व्यवसाय नियमानुसार मर्यादित कालावधीत सुरू आहेत, त्यातही वीजखंडित झाल्याने नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मनोरुग्णालयाचे २९ लाखांचे वीजबिल थकले आणि महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने मनोरुग्णांना अंधारात बसावे लागले. भाजपने याची दखल घेऊन आघाडी सरकारचा, सत्ताधाऱ्यांचा निषेध करून मनोरुग्णालयाजवळ मेणबत्या पेटवून आंदोलन केले. लाइट येणार नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका स्थानिक भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव, कार्यकर्ते व नागरिकांनी घेतल्याने महावितरणने पुरवठा पूर्ववत केल्याचा दावा केळकर यांनी केला आहे.