डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे अर्भकाचा मृत्यू; महासभेत नगरसेवकाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:06 AM2019-06-22T00:06:34+5:302019-06-22T00:07:30+5:30
चौकशी करून कारवाई करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
ठाणे : बाळकुम येथील प्रसूतिगृहात डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे नवजात बालकाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती देऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी चौकशीनंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
शुक्रवारी महासभा सुरू होताच, देवराम भोईर यांनी १९ जून रोजी बाळकुम येथील प्रसूतिगृहात घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली. बाळकुम भागात राहणारी कविता चव्हाण ही गरोदर महिला १९ जून रोजी सकाळी प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने बाळकुम प्रसूतिगृहात गेली होती. परंतु, तिला तपासून घरी सोडण्यात आले. त्यानंतर, सायंकाळी पुन्हा तिचे दुखणे वाढल्याने ती तेथे दाखल झाली. त्यानंतर, ती वारंवार येथील रुग्णालय प्रशासनाला आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगत असतानाही त्याकडे येथील परिचारिका आणि डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप भोईर यांनी केला. रात्री २ च्या सुमारास तिला प्रसूतीच्या कळा असह्य झाल्यामुळे तिने ओरडण्यास सुरुवात केली. परंतु, त्याठिकाणी असलेल्या स्टाफने याची कोणतीही दखल घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वेदनेने असह्य झालेली महिला बेडवरून खाली उतरताच, तिचे बाळही त्याचवेळेस खाली पडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप भोईर यांनी केला. त्यानंतर, याचा आवाज झाल्याने सर्व स्टाफ त्याठिकाणी दाखल झाला. त्यानंतर, पुढील उपचाराचे कारण देऊन त्यांना कळवा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, येथील डॉक्टरांनी बाळ मृत असल्याचे स्पष्ट केले. केवळ डॉक्टर आणि येथे रात्रपाळीस असलेल्या स्टाफने या महिलेकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप भोईर यांनी केला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर सभागृहातील इतर सदस्यांनीसुद्धा या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
या प्रकरणाची चौकशी सुरूअसल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली. परंतु, प्राथमिक चौकशीत ते बाळ प्रसूतीपूर्वीच दगावले असेल, अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे सदस्य आणखीनच आक्रमक झाले. अखेर, या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे केंद्रे यांनी स्पष्ट केले.
आरोग्यसेवेवरील खर्चाची श्वेतपत्रिका काढा
या घटनेच्या अनुषंगाने कळवा रुग्णालयात मार्च महिन्यात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेच्या शस्त्रक्रियेनंतर शरीरात कापड अडकल्याची धक्कादायक माहिती राष्टÑवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी यांनी उघडकीस आणली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अशा प्रकरणांबाबत केव्हा गंभीर होणार, असा सवालही त्यांनी केला. तर, कळवा रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. नवनवीन उपकरणे मागवली जातात. परंतु, त्याचे पुढे काय होते, असा सवाल करून या सर्व खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली.