ऑक्सिजनअभावी बाळंतीणीचा मृत्यू?; सिझेरियननंतर सिल्वासाला नेताना घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 08:58 AM2023-09-22T08:58:53+5:302023-09-22T08:59:04+5:30
सातपाटीत भाड्याच्या घरात ही दुर्दैवी महिला तिचा पती किशोर आंग्रेसह राहत होती. कल्याणी दुसऱ्या खेपेला गर्भवती राहिल्यानंतर तिने आपले नाव सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.
पालघर : सातपाटी येथे राहणाऱ्या कल्याणी आंग्रे या २९ वर्षीय महिलेची पालघर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर ती अत्यवस्थ झाली. यामुळे तिला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे घेऊन गेल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने अवघ्या दोन दिवसांचे बाळ मातेला मुकले आहे. प्रसूतीनंतर व्यवस्थित असणाऱ्या आपल्या पत्नीला योग्य ते उपचार करण्यात आले नाहीत आणि तिला ऑक्सिजनचा योग्य तो पुरवठा देण्यात न आल्याने कल्याणी अत्यवस्थ झाली, असा आरोप तिच्या पतीसह नातेवाइकांनी केला आहे.
सातपाटीत भाड्याच्या घरात ही दुर्दैवी महिला तिचा पती किशोर आंग्रेसह राहत होती. कल्याणी दुसऱ्या खेपेला गर्भवती राहिल्यानंतर तिने आपले नाव सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. डॉक्टरांकडून ती आपली नियमित तपासणी करून घेत होती. मंगळवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने ती सातपाटीवरून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. तिची सिझरिंग प्रसूती झाल्यानंतर बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितल्याने पतीसह सर्व आनंदात होते. मात्र, बुधवारी पहाटे अचानक तिला अत्यवस्थ वाटू लागले. यानंतर तिला उपचारासाठी इतरत्र हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या.
रक्तवाहिन्यांत गुठळ्या
कल्याणी हिला शासकीय ॲम्ब्युलन्सद्वारे केंद्रशासित सिल्वासा येथे नेत असताना ऑक्सिजन पुरविण्यात आला नसल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला आहे.
डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर संशय
प्रसूतीनंतर प्रकृती चांगली असणाऱ्या महिलेची काही तासांतच तब्येत बिघडून तिचा मृत्यू झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या पालघर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर नातेवाइकांनी संशय व्यक्त केला आहे. संबंधित दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी जिल्हा परिषद सदस्य करिश्मा उमतोल यांनी केली आहे.
हलगर्जीपणामुळे मृत्यू?
पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नुकतेच एका सर्पदंश झालेल्या तरुणीचा उपस्थित नवशिक्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला होता. त्यामुळे त्या डॉक्टरला हटविण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या महिलेसोबतच अन्य तीन महिलांच्या प्रसूती झाल्या असल्याचे सांगून या दुर्दैवी महिलेच्या शरीरातील रक्त वाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने ती अत्यवस्थ झाल्याचे डॉ. बोदाडे यांनी सांगितले.
तिच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने खाली आली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. - डॉ. दीप्ती गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय