एमएमआरडीए गृहसंकुलात दूषित पाणी
By admin | Published: July 24, 2015 03:26 AM2015-07-24T03:26:08+5:302015-07-24T03:26:08+5:30
एमएमआरडीए मार्फत पालिका हद्दीतील चेकनाका परिसरात बांधण्यात आलेल्या भाडेतत्वावरील गृहसंकुलातील पिण्याच्या पाण्याच्या
भार्इंदर : एमएमआरडीए मार्फत पालिका हद्दीतील चेकनाका परिसरात बांधण्यात आलेल्या भाडेतत्वावरील गृहसंकुलातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ड्रेनेज लाईन लिकेज झाल्याने येथील रहिवाशांना विष्ठ मिश्रित पाणी प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिकेने लोढा अॅक्वा या गृहसंकुलासाठी मुंबईच्या काऊनटाऊन डेव्हलपर्स लि. या बांधकाम कंपनीला परवानगी दिली होती. त्यातुन पालिकेला प्राप्त नागरी सुविधा भुखंडावर एमएमआरडीएने सुमारे २ हजार सदनिकांचे भाडेतत्वावरील गृहसंकुल बांधले आहे. त्यातील ५० टक्के सदनिका पालिकेला देण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यातील सुमारे ७०० सदनिका पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या सदनिका शहरातील धोकादायक इमारतींतील रहिवाशांना सुमारे ३ हजार ५०० रु. प्रती महिन्याप्रमाणे भाडेतत्वावर देण्याचा ठराव तत्कालिन महासभेत मंजुर करण्यात आला आहे. परंतु, यातील एकही सदनिका धोकादायक इमारतीतील रहिवाशांना अद्याप देण्यात आली नसली तरी बीएसयुपी योजनेतील सुमारे ४५० लाभार्थ्यांना भाडेतत्वावर त्या दिल्या आहेत. लाभार्थ्यांसह संक्रमण शिबिरातील लाभार्थ्यांना भाडेतत्वावरील गृहसंकुलात स्थलांतरीत करण्यात आले आहे. या गृहसंकुलातील सोई-सुविधांची कोणतीही खात्री न करता पालिकेने त्या लाभार्थ्यांना स्थलांतर केल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासुन येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ड्रेनेज लाईन लिकेज झाल्याने रहिवाशांना सुरुवातीला दुर्गंधीयुक्त पाणी मिळु लागले होते.