मीरा-भाईंदरमध्ये पालिका पथकांना कामचुकारपणाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:56+5:302021-09-15T04:45:56+5:30
मीरा रोड : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, शहर कोरोनामुक्त असावे या हेतूने मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त ...
मीरा रोड : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, शहर कोरोनामुक्त असावे या हेतूने मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात नेमलेली ५७ पथके बेपत्ता झाली आहेत. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असताना कोरोना रोखण्यासाठी नेमलेल्या या पथकांनाच कामचुकारपणाचा संसर्ग झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक सातत्याने करत हाेते. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी एप्रिलमध्ये तब्बल ५७ गस्ती पथके शहरात नेमली. या प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षारक्षक आणि एक पोलीस कर्मचारी अशा पाच जणांचा समावेश केला. पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय नेमण्यात आले. या पथकांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करायची जबाबदारी साेपविण्यात आली होती. मात्र, महिनाभरापासून या पथकांचे कुठे अस्तित्वच जाणवत नाही. या पथकांनी केलेल्या कारवाईविषयीची प्रसिद्धीपत्रकेही पालिकेने देणे बंद केले आहे. शहरात नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले असून पालिका मुख्यालयातही मास्क न घालता माेकाट फिरणारे अनेक जण आहेत. मास्क नाही तर प्रवेश नाही हे स्टिकर व अन्य बाबींवर केलेला खर्चही वाया गेला आहे. कोरोना संसर्ग पसरण्यास बेशिस्तपणा कारणीभूत ठरत असून कारवाईचा कठोर बडगा उगारणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी नेमलेली पथकेच दिसेनाशी झाली असून त्यावर पालिका आणि राजकारणीही चिडीचूप आहेत.
नागरिकांमध्ये बेफिकिरी
मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदी ठिकाणी वावरत आहेत. भाज्या-मासळी आदी खरेदीसाठी प्रचंड गर्दी करणे, खाण्या-पिण्याच्या ठिकाणीही गर्दी असते. गणेशोत्सवात तर सार्वजनिक मंडळांसह मूर्ती स्वीकृती केंद्र व विसर्जन ठिकाणीही सर्रास मास्क न घालणारे मोकाट फिरत आहेत.