उल्हासनगरात शिधा वाटप कार्यालय कडून निकृष्ट धान्य वाटप, मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 05:55 PM2020-10-03T17:55:01+5:302020-10-03T17:56:32+5:30
ulhasnagar News : सरकार कडून गोर-गरीब जनतेला स्वस्त दराने गहू, साखर. तांदूळ, तेल, डाळीचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसापासून देण्यात येणारा गहू निकृष्ट दर्जाचा दिला जात असल्याची माहिती मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांना काही महिलांनी दिली.
उल्हासनगर - शहरातील शिधा वाटप दुकानातून निकृष्ट दर्जाचा गहू नागरिकांना दिला जात असल्याचा प्रकार उघड झाला. याविरोधात मनसेने आवाज उठवून शिधा वाटप अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले.
सरकार कडून गोर-गरीब जनतेला स्वस्त दराने गहू, साखर. तांदूळ, तेल, डाळीचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसापासून देण्यात येणारा गहू निकृष्ट दर्जाचा दिला जात असल्याची माहिती मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांना काही महिलांनी दिली. तसेच दिलेला गहू प्राणीही खात नसल्याचे त्यांचे म्हणणें होते. मैनुद्दीन शेख यांनी पक्षाच्या पदाधिकारी व महिलांसह उल्हासनगर पश्चिम येथील शिधा वाटप कार्यालय गाठून जाब विचारला. चांगल्या प्रतीचा व खाण्यायोग्य गहू सर्वसामान्यांना उपलब्ध करून न दिल्यास पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी मनसे पदाधिकारी व महिलांनी निकृष्ट दर्जाचा गहू शिधावाटप अधिकाऱ्याला भेट म्हणून दिला. तसेच देण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा गहू राज्य शासनातील आघाडीच्या सरकारला पाठविण्याचे संकेत दिले.
यानंतरही निकृष्ट गहू शिधा वाटप दुकानातून दिला गेलातर, याला केंद्र,राज्य सरकारसह अधिकारी जबाबदार राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी उल्हासनगर मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख, अक्षय धोत्रे, बादशहा शेख, महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा शफिया सय्यद,उप-विभाग अध्यक्षा मीना मोरे तसेच शहरातील महिला उपस्थित होत्या.