रेशन दुकानदाराने दिले निकृष्ट तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:05 AM2020-05-31T00:05:46+5:302020-05-31T00:05:53+5:30
जावसईमधील घटना। कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : जावसई गावातील एका रेशन दुकानदाराने त्याच्याकडील वाया गेलेले तांदूळ हे ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी तक्रार केल्यावर दुकानदाराने लागलीच चांगल्या दर्जाचा तांदूळ ग्राहकांना दिला. मात्र, आपले दुकान बंद करून ग्राहकांना तेथून जाण्याचा दम दिला. या रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी रहिवासी गायत्री घोणे यांनी केली आहे.
जावसई गावातील अनेक कुटुंबे हे रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत. या गावातील दुकानदाराने आता ग्राहकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्यावर त्याने ग्राहकांच्या माथी खराब झालेले आणि काळे पडलेले तांदूळ दिले. गरजू महिलांनी आणि काही कुटुंबीयांनी ते धान्य स्वीकारले. मात्र, दुकानात चांगले तांदूळ असतानाही खराब झालेले तांदूळ देत असल्याची बाब या परिसरातील महिलांना कळताच त्यांनी दुकानदाराला जाब विचारला. महिलांनी घोळका केल्याने घाबरलेल्या दुकानदाराने खराब तांदूळ परत घेऊन चांगल्या दर्जाचे तांदूळ ग्राहकांना दिले.
मात्र, ते देत असताना इतर ग्राहकांनाही तशाच प्रकारचे तांदूळ द्यावे लागत असल्याने दुकानदाराने गर्दी असतानाही दुकान बंद करून ग्राहकांना घरी जाण्याचा दम दिला. परिसरातील जागरूक नागरिक गायत्री घोणे यांनी दुकानदाराच्या कारभाराचे चित्रीकरण केले असून त्याची तक्रार शिधावाटप अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी शिधावाटप अधिकाऱ्यांनी बचावात्मक भूमिका घेत नागरिकांची तक्रार आली, तर दुकानदारावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.