नियमित सफाई, फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:22+5:302021-09-27T04:44:22+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका शहरातील अंतर्गत गटारांची साफसफाई नियमित करत नाही तसेच कीटकनाशकांची फवारणीसुद्धा नियोजनबद्ध करत नसल्याने डासांचा ...
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका शहरातील अंतर्गत गटारांची साफसफाई नियमित करत नाही तसेच कीटकनाशकांची फवारणीसुद्धा नियोजनबद्ध करत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पत्र स्वीकृत नगरसेवक अजित पाटील यांनी आयुक्तांना दिले आहे.
शहरातील गटारे ही सांडपाण्याने तसेच कचरा व गाळाने भरलेली आहेत. गटारांची नियमित सफाई पालिका करत नाही. त्यामुळे सांडपाणी तुंबून राहते व कीटकनाशक फवारणी परिणामकारक होत नाही. जेणेकरून पैशांचा अपव्यय होत आहे. मुळात आरोग्य विभाग आणि वैद्यकीय विभाग यांच्यात समन्वय नाही, असे अजित पाटील यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांना ग्रामपंचायत काळात कीटकनाशक फवारणी करणार याची अगोदर माहिती असायची, पण नागरिकांना आता फवारणीची पूर्वसूचना दिली जात नाही. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमितपणे व नियोजनपद्धतीने जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. त्यासाठी काही उपाययोजना त्यांनी सुचवल्या आहेत.