बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्राच्या जागेत घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:01 AM2018-10-24T00:01:53+5:302018-10-24T00:01:55+5:30
शहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या इमारतीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याचा ठराव करण्यात आला असताना विनापरवानगी निवडणूक कार्यालय, प्रांत कार्यालय आणि पोलीस उपायुक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या इमारतीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याचा ठराव करण्यात आला असताना विनापरवानगी निवडणूक कार्यालय, प्रांत कार्यालय आणि पोलीस उपायुक्त कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ही तिन्ही कार्यालये सुरू करताना स्थायी समिती अथवा महासभेची मंजुरी घेतलेली नाही. कोणाच्या आदेशाने हा वापर सुरू झाला त्याचा पत्ता प्रशासनालाही नाही. धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही कार्यालयाचे भाडे थकले आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शालिनी वायले पाठपुरावा करीत आहे. त्यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाकडून थंड प्रतिसाद दिला जात आहे.
शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्राच्या जागेतील घुसखोरी रोखण्यात सत्ताधारी असमर्थ ठरल्याने शिवसेनेचा प्रशासनावर वचक नसल्याची कबुली वायले यांनी दिली आहे. यापूर्वी वसंत व्हॅली येथे सुरू करण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे बस डेपो बंद पडला असल्याकडे शिवसेनेचे माजी परिवहन सभापती रवींद्र कपोते यांनी लक्ष वेधले. विकासकाने विकसित केलेल्या इमारतीत सांस्कृतिक कला केंद्रासाठी जागा दिली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक कला केंद्र सुरु करण्याचा ठराव २०१५ साली महासभेत मंजूर झाला. १३५० चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेत तळ अधिक दोन मजले हे सांस्कृतिक कला केंद्रासाठी राखीव होते. मात्र तळमजल्यावर कल्याण पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आहे. त्याचा ताबा २०१६ मध्ये दिला गेला आहे. त्यांच्याकडून भाड्यापोटी जवळपास एक कोटी रुपये थकले आहेत. पहिल्या मजल्याचा वापर कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालय करीत आहे. ही जागा तीन वर्षे कालावधीकरिता दिली गेली होती. भाड्यापोटी निवडणूक कार्यालयाकडे १ कोटी ५३ लाख रुपये थकले आहेत. त्याचा भरणा करण्याची सूचना महापालिकेने निवडणूक अधिकारी यांना केली आहे.
दुसऱ्या मजल्यावरील प्रांत कार्यालयाची मुदत संपुष्टात येऊन दोन वर्षे झाली आहेत. या कार्यालयाच्या भाड्यापोटी महापालिकेस १ कोटी ४८ लाख रुपये येणे आहे. भाडे भरुन दुसरा मजल्यावरील कार्यालय सोडावे, अशी नोटीस मालमत्ता व्यवस्थापकांनी बजावली आहे. त्याला प्रांत कार्यालयाने उत्तर दिलेले नाही.
>केडीएमसीविरोधात करणार उपोषण-वायले
लाक्षणिक उपोषण करणार ही तिन्ही कार्यालये सांस्कृतिक कला केंद्राच्या जागेत सुरू करण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली असा सवाल वायले यांनी प्रशासनाला केला होता. त्यांना लेखी उत्तरात वरिष्ठांच्या मंजुरीने दिली आहेत, असे मोघम उत्तर देण्यात आले आहे. वायले यांच्या पाठपुराव्यास प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्याने येत्या आठवड्यात वायले महापालिकेच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना दिला आहे.