प्रथम श्रेणीच्या डब्यात सेकंड क्लासच्या महिलांची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 01:02 AM2019-11-17T01:02:42+5:302019-11-17T01:05:18+5:30

महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये होणारी घुसखोरी थांबायलाच हवी. ती रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कमी पडत असून हजारो रुपये खर्च करूनही आम्हाला आरामदायक प्रवास मिळत नाही.

Infiltration of second class women into first class coaches | प्रथम श्रेणीच्या डब्यात सेकंड क्लासच्या महिलांची घुसखोरी

प्रथम श्रेणीच्या डब्यात सेकंड क्लासच्या महिलांची घुसखोरी

Next

- प्रतीक्षा गुजर, डोंबिवली

महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये होणारी घुसखोरी थांबायलाच हवी. ती रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कमी पडत असून हजारो रुपये खर्च करूनही आम्हाला आरामदायक प्रवास मिळत नाही. त्यासाठी रेल्वे प्रशासनाएवढेच महिला प्रवासीही जबाबदार आहेत. सेकंड क्लासचे प्रवासी बिनधास्त फर्स्ट क्लासच्या डब्यात चढतात. त्यांना सांगूनही त्या खाली उतरत नाहीत. असे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांची अडचण होते. रोजच्या प्रवासात भांडणे, कटकटींचे प्रकार वाढले आहेत. याला रेल्वे प्रशासन आळा घालू शकते, पण इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

वर्षभरात डोंबिवली रेल्वेस्थानक प्रबंधकांना तीन वेळा स्मरणपत्रे दिली. पण, त्याचा काहीही फायदा झाला नाही. गुरुवारीही कामावरून घरी जाताना संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्थानक प्रबंधकांना स्थानकातील टीसी कुठे आहेत, असा जाब विचारला होता. लोकलमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यात व विशेषत: महिलांच्या बोगीत जागा नसतेच. जेमतेम १५ आसनव्यवस्था असलेले डबे किंवा फारतर मागचे डबे पकडले तर ३० महिला बसू शकतील एवढीच काय ती जागा. दिवसेंदिवस महिला प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यातही फर्स्ट क्लासचा मासिक पास परवडत नाही, म्हणून सेकंड क्लासचा पास काढायचा आणि बिनधास्त फर्स्ट क्लासमधून प्रवास करायचा, असा अनेक महिलांचा नित्यक्रम आहे. फर्स्ट क्लास पासधारक महिलांनी आवाज उठवला, तर त्याला विरोध करण्यात येतो. ही दादागिरी नव्हे तर काय? ती कोणी आणि कशासाठी सहन करायची? महिला तिकीट तपासनीस वर्षभरात कधीही स्थानकात दिसली नाही. त्यांची मागणी डोंबिवली, दादर स्थानकांत करण्यात आली आहे, पण ती अजून मिळालेली नाही. ही सोशिक प्रवाशांची शोकांतिका म्हणावी की, रेल्वे प्रशासनाचा डोळेझाकपणा. रेल्वेने याबाबत कठोर पावले उचलायला हवीत. आधीच लोकलफेऱ्या वाढत नाहीत, त्यातही ज्या सुविधा आहेत त्या नावाला आहेत. डब्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. बसायला जागा नाही, तासन्तास उभे राहून प्रवास करायला लागतो. कधीही गाड्या वेळेवर सुटत नाहीत. गेले वर्षभर यासंदर्भात दादर, डोंबिवली स्थानकांत पाठपुरावा सुरू आहे. सकाळी ७.२१ पासून संध्याकाळी ५.३० पर्यंत विविध वेळांना उपलब्ध महिला तिकीट तपासनिसांची माहिती मागवली. पण ती कधीही मिळालीच नाही. त्यामुळे महिला प्रवाशांचे फावते, कधी तपासणीच होत नाही म्हटल्यावर महिला बेकायदा फर्स्ट क्लासमध्ये चढतात. त्यांना कारवाईची भीतीच राहिलेली नाही.

रेल्वेला अगोदरच महिनाभराच्या प्रवासाचे पैसे पासाद्वारे मिळालेले असतात, त्यामुळे काही समस्या आली तरी प्रवासी फक्त तक्रारी करतील, आरडाओरडा करतील, आणि निघून जातील. ज्या अधिकाऱ्यांकडे मी वर्षभरात तीन वेळा तक्रार केली आहे, त्यांनी वेळोवेळी अनाउन्समेंट करून स्थानकातील तिकीट तपासनिसांना बोलावले, पण एकदाही कोणी आले नाही, त्यावरूनच रेल्वेच्या भोंगळ कारभाराची प्रचीती येत आहे. सुजाण, जाणकार प्रवासी पाठपुरावा करू शकतो, पण तो कायदा हातात घेऊ शकत नाही. हे वातानुकूलित दालनात बसणाºया रेल्वे अधिकाºयांना माहीत आहे, त्यामुळे ते कारवाई करण्याचे टाळतात. त्याचा फायदा घेत महिला प्रवासीच सहमहिला प्रवाशांची कुचेष्टा, थट्टामस्करी करतात. त्याला कोणी काही करू शकत नाही, हे खूप वेदनादायक, त्रासदायक आहे.


मनुष्यबळाचा अभाव ही तर लटकी सबब
आम्हाला महिला प्रवासीच महिलांची अडचण करतात, याचा अनुभव वेळोवेळी आला आहे. दरवाजा अडवणे, खिडक्या अडवणे, डब्यातील मधल्या पॅसेजमधून पुढे न सरकणे अशा बाबींमुळे महिलांना रोजचा प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यासाठी महिलांच्या डब्यासमोर सुरक्षारक्षक (महिला) नेमणे गरजेचे आहे. तेवढे मनुष्यबळ रेल्वेकडे नाही, पण त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यायला काय हरकत आहे. ज्या महिला पुढे येतील, त्यांना रेल्वेने आयकार्ड द्यावे म्हणजे त्यांना काम करायला सोपे जाईल.
फर्स्ट क्लासमध्येही ज्यांच्याकडे तसा पास, तिकीट नाही, त्यांना वेळीच अटकाव केला तर कोणाची हिम्मत होणार नाही. पण वाढत्या लोंढ्यांमुळे कारवाईच करायची नाही, हे योग्य नाही. एखादी महिला जर वर्षभर टीसीची मागणी करत आहे, तर तिच्या सांगण्यात तथ्य आहेच. याची जाण रेल्वे अधिकाऱ्यांना हवी. जे अधिकारी कानाडोळा करत असतील, त्यांनी स्वत:चे अधिकार वापरायला हवेतच.
जर महिला कमी पडत असतील तर सामाजिक बांधीलकी म्हणून रेल्वेला सहकार्य करण्यासाठी डोंबिवली, ठाणे अशा गर्दीच्या ठिकाणी मी महिला कार्यकर्त्या द्यायला तयार आहे. त्यासंदर्भात रेल्वे पोलिसांकडे पत्रव्यवहार केला आहे. पण, अनेकदा महिलाच महिलांची छळवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून हे दुखणे कोणाकडे मांडावे, असा प्रश्न पडत आहे.
- वंदना सोनावणे,
महिला प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी
(शब्दांकन : अनिकेत घमंडी)

महिला विशेष लोकलचा पत्ता नाही
एवढी वर्षे झाली एकही महिला लोकल कसारा मार्गावरून सुटलेली नाही. कल्याणमधून एकच सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी ‘नावाला’ सुटते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना ज्या काही मोजक्या लोकल आहेत, त्या लोकलनेच गर्दीत घुसमटत जावे लागते. त्यामुळे घराचे सगळे वेळापत्रक कोलमडते. कधीच गाड्या वेळेवर नसतात. स्त्रीला कौटुंबिक व कामाच्या ठिकाणी जबाबदाºया सांभाळाव्या लागतात. त्यात प्रवासात होणारी दगदग यामुळे कोंडी होते. पण कोणापुढे बोलायची सोय नाही.
वासिंदपासून ते शहाड स्थानकापर्यंतचा विचार केला तर अद्ययावत स्वच्छतागृह नाही, तेथेही महिलांची कुचंबणा होते. जेथे ती सुविधा आहे तेथे पाणी नाही, तर सुरक्षित वाटत नाही. वासिंद येथे सकाळी ११.२३, सकाळी ११.५५ ला सुटणाºया लोकलमध्ये महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी असते. त्यात भंगार गोळा करणाºया महिलांच्या डब्यात चढतात. आधीच लोकल खचाखच भरलेली असते. त्यात त्या महिला दरवाजा अडवतात. त्यामुळे स्थानकांमध्ये चढायला, उतरायला समस्या निर्माण होते. त्याचा त्रास अनेक महिने होत आहे. पण, आरपीएफ, जीआरपी या पोलीस यंत्रणा काही करत नाहीत, आमची अडचण कोण समजून घेणार.
- मीना फर्डे, वासिंद

विकृतीचे अनुभव पदोपदी येतात
मध्यंतरी लोकलमध्ये मानवी विष्ठा आसनांवर लावण्याच्या घटना घडल्या. काही वेळेला गर्दुल्ले पादचारी पुलांवर बसलेले असतात. त्यांची मुलींना भीती वाटते. अनेकदा काही विकृत पुरुष उघड्यावर शौच करतात, महिलांच्या डब्यासमोर उभे असतात. नको त्या नजरेने बघतात. अनेकदा महिलांच्या डब्याला लागून पुरुषांचा डबा असतो. त्यातून पुरुष एखाद्या महिलेकडे एकटक बघत असतात, हशा पिकवतात, शिट्या वाजवतात, गाणी म्हणतात. पण, केवळ तक्रार करणे हा एकमेव पर्याय असला, तरीही सगळ्याच महिला त्यासाठी पुढे येत नाहीत. त्या अडचणी सोडवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेलाच पुढे यावे लागणार आहे. अनेकदा महिलाच महिलांच्या समस्यांना कारणीभूत असतात. डबे मर्यादित असल्याने सहप्रवाशांना जागा देणे, ज्येष्ठांना जागा देणे हे दिसून येत नाही. युवतींमध्ये ही वृत्ती अधिक दिसून येते. त्यातच मोबाइलवर बोलणे, कानात हेडफोन लावणे, ऐकून न ऐकल्यासारखे करणे अशाही घटना वाढत आहेत. सहमहिला प्रवासी वयाने मोठ्या असल्या तरीही त्याचे भान न ठेवता एकेरी भाषेत बोलणे, अर्वाच्य बोलण्याच्या घटना वाढत आहेत. हे सगळे प्रकार महिलांची छळवणूक करणारेच आहेत ना?
- विनया जाधव (नाव बदलले आहे)

Web Title: Infiltration of second class women into first class coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल