बापरे! महागाईनं कंबरडं मोडलं; चिकन पेट्रोल दरापेक्षा 'ही' भाजी महागली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:12 PM2021-11-18T18:12:13+5:302021-11-18T18:12:24+5:30
कोरोनाच्या काळात लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत, त्यामुळे शरीरासाठी पौष्टीक अशा भाज्या खाण्याकडे लोकांचा जास्त कल वाढू लागला आहे..
रणजीत इंगळे
ठाणे - सध्या भाज्यांचे दर हे पेट्रोल आणि चिकन पेक्षाही महाग झालेत. इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे ,त्यात शेवग्याच्या शेंगाची किंमत तर ४०० रुपये किलो झालीय , तर मटार २०० रुपये किलो झालेत .त्यामुळे ग्राहकवर्गात नाराजगी पसरली आहे. त्यामुळे भाज्या घ्याव्यात की चिकन घ्यावे हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.
आमटी, डाळ, सांबरची चव वाढवणारी तसेच कोरोणच्या काळात अत्यंत गुणकारक असलेली शेवग्याच्या शेंगा बाजारात ३८० ते ४०० रुपये किलो दराने विकली जात आहे. आजच्या घडीला सर्वात महागडी भाजी म्हणून शेवग्याची शेंग भाव खात असल्याने जेवणाच्या ताटातून ती हद्दपार होऊ लागली आहे. नवरात्रोत्सव व दिवाळी या सणासुदीच्या दिवसानंतर अनेकांचा मांसाहार सोडून शाकाहरी खाण्याकडे अधिक कल असतो... भाजी मंडईत सकाळी वाशी, नाशिक, कल्याण येथील मार्केट मधून भाजीपाल्याची आवक होत असते.
परंतु इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. त्यात कोरोनाच्या काळात लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत, त्यामुळे शरीरासाठी पौष्टीक अशा भाज्या खाण्याकडे लोकांचा जास्त कल वाढू लागला आहे. यासाठीच आरोग्यवर्धक आणि पदार्थाची लज्जत वाढवणाऱ्या शेवग्याच्या शेंगा काही दिवसापुरवी 100 रुपये किलोने विकल्या जात होत्या. मात्र सध्या ह्याच शेंगा ३८० व ४०० रुपये दराने विकल्या जात आहे. तर मटार २०० रुपये किलो झालेत ...म्हणजेच चिकनपेक्षा ही शेंगा महाग झाल्यात... त्यामुळे आम्ही पहिले हफ्त्याभराच्या भाज्या विकत घेत होतो ,परंतु आता मात्र फक्त १ ते २ दिवसाच्या भाज्याच विकत घेतो, ते ही पाव किलो ते अर्धा किलो असे ग्राहक सांगत आहेत.. भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे भाजी विक्रेतेही यामुळे चिंतेत आहेत , अश्या महागड्या भाज्यांच्या खरेदीत ग्राहकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे. त्यामुळे भाज्यांचे दरवाढ कधी कमी होईल याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.