बाप्पाच्या नैवेद्यावर महागाई विघ्न, माेदकांचे दर भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:45 AM2021-09-05T04:45:41+5:302021-09-05T04:45:41+5:30
प्रज्ञा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणून ओळख असलेल्या उकडीच्या मोदकांना महागाईची झळ पोहोचली आहे. ...
प्रज्ञा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणून ओळख असलेल्या उकडीच्या मोदकांना महागाईची झळ पोहोचली आहे. या मोदकांचे दर गगनाला भिडले असून, या वर्षी उकडीचा मोदक २९ रुपयांना मिळत आहे. त्याचप्रमाणे, दूध, मावा, काजूचे दर वाढल्याने मोदकही महागले आहेत. अफगाणिस्तानच्या परिस्थितीमुळे सुक्या मेव्यापासून बनविण्यात येणाऱ्या मोदकांना महागाईचा फटका बसला आहे.
गणपती बाप्पाचे आगमन पाच दिवसांवर येऊन ठेपले असून, घरोघरी, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात स्वागताची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या आवडच्या म्हणून उकडीच्या मोदकांना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. ते बनविण्यासाठी नारळ, गूळ या पदार्थांचा उपयोग होतो. या पदार्थांसह वाहतूक खर्च वाढल्याने, गेल्या वर्षापेक्षा यंदा उकडीच्या मोदकांचे दर दुकानदारांनी वाढविले आहेत.
उकडीचे मोदक नाशवंत पदार्थ असल्याने ते गणेश चतुर्थी, आई गौरी आगमनावेळीच खरेदी केले जातात. इतर दिवशी मावा आणि इतर मोदक खरेदी होतात, परंतु या दोन्ही दिवशी मात्र उकडीचा मोदकांना प्रचंड मागणी असते.
------------------------------------
उकडीचा मोदकांचे दर (प्रति नग / रुपये)
२०१९ : २२
२०२० : २६
२०२१ : २९
------------------------------------
मिठाई मोदकांचे दर (प्रति किलो / रुपये)
मावा मोदक : आधी ६००- आता ६४०
काजू मोदक : आधी १०००- आता ११००
मलाई मोदक : आधी ६४०-आता ६८०
चॉकलेट मलाई मोदक : आधी ६००- आता ८००
आंबा : आधी ६६०- आता ७२०
कंदी मोदक : आधी ७००- आता ७४०
-------------
कडक बुंदीचा मोदक (आकारमानाप्रमाणे / प्रतिनग रुपये)
कमीत कमी आकार २०० ग्राम : आधी ६०-आता ७५
जास्तीत जास्त आकार ११ किलो : आधी ३,००० आणि ३,५००
------------------------------------
का महागले दर?
दुधाचे दर तीन ते चार रुपयांनी वाढले आहेत. गॅसचे दर दुप्पट झाल्याने या सर्वांचा परिणाम मोदकांच्या दरवाढीवर झाला आहे, तसेच अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम सुक्या मेव्याच्या दरवाढीवर झाला आहे. काजूचे दर ७०० रुपयांवरून ९०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे काजू मोदकही प्रचंड वाढले आहेत, असे दुकान मालकांनी सांगितले. कच्च्या मालाचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
------------------------------------
मोदकांचे दर वाढविले असून, शुक्रवारपासून आम्ही ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. दर वाढविल्यामुळे ग्राहकांमध्ये निश्चितच नाराजी असेल आणि ती स्वाभाविक आहे. त्यामुळे विक्री नक्कीच कमी होईल, ही कल्पना असल्याने, आम्ही मालही कमी प्रमाणात बनविणार आहोत
- सिद्धार्थ जोशी, दुकान मालक
------------