Jitendra Awhad: सत्ताधाऱ्यांनो, काहीतरी बोला, अन्यथा पुढचा काळ कठीण; आव्हाडांचा मोदी सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:41 PM2022-04-18T18:41:05+5:302022-04-18T18:41:22+5:30
काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असं विचारणाऱ्यांचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. जागतिक बाजारात महागाई वाढली तेव्हा आम्ही ती महागाई देशात रोखून धरली होती याची आठवण त्यांनी सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांना करून दिली.
महागाईने देशातील जनतेचे जगणे कठीण केले आहे. उन्हाच्या चटक्यापेक्षा महागाईचा चटका जास्त बसतोय, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मागील मार्च महिन्यात देशात महागाईचा दर हा ७.०२ टक्क्याच्या आसपास होता. यंदा महागाईचा दर १४ टक्क्यांच्याही वर गेला आहे. मागील सत्तर वर्षात कधी नव्हती एवढी महागाई आता शिगेला पोहचली आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असं विचारणाऱ्यांचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. जागतिक बाजारात महागाई वाढली तेव्हा आम्ही ती महागाई देशात रोखून धरली होती याची आठवण त्यांनी सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांना करून दिली. तसेच जागतिक बाजारात महागाई नसतानाही आपल्या देशात महागाई आहे ही खंत त्यांनी व्यक्त केली.
इंधन दर, गॅस दर कुठे पोहचले आहेत याची माहिती मध्यमवर्गीय महिलांकडून, वाहन चालवणाऱ्या व्यक्तींकडून जाणून घ्यावी. महागाई भाजून काढत आहे, उन्हाच्या चटक्यापेक्षा महागाईचा चटका जास्त बसतोय. अशा परिस्थितीत देशात नॉन इश्यूचा इश्यू केला जात आहे. याद्वारे महागाईकडे लक्ष जाऊ नये असे प्रकार घडवले जात आहेत, असे आव्हाड म्हणाले. त्यामुळे देशातील सत्ताधाऱ्यांनी महागाई आवरती घ्या, महागाईवर काही बोला, अन्यथा पुढचा काळ कठीण आहे, असा सल्ला त्यांनी दिला.