महाराष्ट्रात साहित्य निर्मितीवर जातीयवादाचा प्रभाव; पद्मश्री डॉ. एस. एल. भैरप्पा यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2022 06:44 AM2022-05-08T06:44:41+5:302022-05-08T06:44:49+5:30
अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जातीयवाद ही फार मोठी समस्या लेखकांमध्ये जाणवत आहे. जातीयवादाचा वाईट प्रभाव साहित्य निर्मितीवर होऊ लागला आहे. राजकीय सोयीकरिता प्रसारमाध्यमे आणि साहित्यिकांकडून वस्तुस्थिती दुर्लक्षिली जाते. आताचे लेखक हे विशिष्ट विचारधारेशी जोडले आहेत. गुजरातमध्ये जातीयवाद दिसून येत नाही. कारण तेथील लोक व्यवसायाभिमुख आहेत; परंतु महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जातीयवाद पाहायला मिळतो, असे परखड प्रतिपादन पद्मश्री डॉ.एस. एल. भैरप्पा यांनी शनिवारी ठाण्यात केले.
अखिल भारतीय साहित्य परिषद आणि समन्वय प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘गप्पा भैरप्पांशी’ हा कार्यक्रम पार पडला. डॉ. उमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सध्याच्या काळात आपल्या देशात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत; मात्र जेव्हा देशात चांगले घडते आहे तेव्हा विरोधकांची संख्या वाढते. वाल्मीकीनी रामायणात २४ मूल्ये सांगितली आहेत. त्यापैकी एक म्हणजे जो या देशात जन्मलेला नाही त्यांनी या देशाचा राज्य कारभार चालवू नये, असेही ते म्हणाले. तंतू कादंबरी आजच्या काळाशी सुसंगत आहे हे सांगताना भैरप्पा म्हणाले की, तुम्ही भावनांशिवाय साहित्य लिहू शकत नाही आणि वैचारिकतेशिवाय ते टिकून राहू शकत नाही. कादंबरी लिहिणे ही एक कला आहे. साहित्य लिहिताना एखादी विचारधारा स्वीकारून लिहिणे सोपे आहे; पण ते स्वतःच्या विचारातून लिहिणे कठीण आहे. कादंबरी लिहिताना एखादे पात्र तयार केले पाहिजे आणि ते कोणत्या मूल्यामध्ये बसवायचे याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
नवोदित लेखकांनी चांगले साहित्य वाचण्याची गरज आहे. इतर दर्जेदार कादंबरी, त्यांची तंत्र, मूल्ये यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या परंपरा जसे की, रामायण, महाभारत, कालिदास यांचे वाचन केले पाहिजे. सद्य:स्थितीवर सडेतोड लेखन आजच्या पिढीने केले पाहिजे. संशोधन, अध्ययन याकडे तरुणांनी वळावे, असा सल्ला भैरप्पा यांनी दिला.
दरम्यान, डॉ. उमा रामराव यांनी अनुवादित केलेले ‘संवादू अनुवादू’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, ऋषीकुमार मिश्रा आदी उपस्थित होते. मकरंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.