ईव्हीएम मशिन बाबत संभ्रमावस्था दूर करण्यासाठी २७ डिसेंबर पासून जनजागृती मोहीम, जिल्हाधिकारी नार्वेकरांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:35 PM2018-12-24T16:35:57+5:302018-12-24T16:38:08+5:30
ईव्हीएम मशिन संदर्भात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पासून जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ३७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ठाणे - मतदारांच्या मनातील इव्हीएम आणि व्ही व्ही पॅट संदर्भात असलेली शंका दूर करण्यासाठी तसेच या मशिन किती निर्दोश आहेत, हे दाखविण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पासून पुढील दोन महिने जिल्हाभरात याचा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
सोमवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१९ मध्ये लोकसभेची निवडणुक येऊ घातली आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईव्हीएम मशिन आणि व्ही व्ही पॅट यापूर्वी २० डिसेंबरला तपासणी झालेली आहे. त्यानुसार आता पुढील टप्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी ३७ वाहने तैनात करण्यात आले असून त्या संदर्भातील परवानगी निवडणुक आयोगाकडून घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात चौक, गर्दीची ठिकाणे या भागात ही जनजागृती मोहीम घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या २६ डिसेंबरला या मशिन बाहेर पडणार आहेत. या जनजागृतीचा मुख्य उद्देश मतदारांपर्यंत या मशिनबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, त्यांना या मशिन बाबत खात्री व्हावी असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मतदाराने मतदान केल्यानंतर त्याने कोणाला मत दिले आहे, याची स्लिप त्याला सात सेकंदापर्यंत पाहता येणार आहे, हे या नव्या मशिनचे उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. या कामी राजकीय पक्षांकडूनसुध्दा मदतीची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या जनजागृतीची एक अजेंडासुध्दा तयार करण्यात आला असून ज्या भागात कार्यक्रम घेतला जाईल त्याची माहिती आधी त्या भागात दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्यात ७७ हजार ४३६ कृष्ण धवल छायाचित्र होते, त्यातील १४ हजार ८६० छायाचित्र रंगीत करण्यात आले असून ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ही जनजागृती मोहीम यशस्वी संपन्न व्हावी यासाठी प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसविली असून, या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती होते अथवा नाही, याची माहिती या माध्यमातून घेतली जाणार आहे. तसेच प्रत्येक वाहन कुठे आहे याची माहितीसुध्दा या माध्यमातून मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.