मुंबई-ठाण्यात म्हाडाची सर्वसामान्यांना परवडणारी घरे, जितेंद्र आव्हाड यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:39 AM2020-09-16T01:39:10+5:302020-09-16T06:35:06+5:30
म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे.
ठाणे : सर्वसामान्यांच्या आवाक्यात घरांचे स्वप्न यावे यासाठी म्हाडाआता मुंबई-ठाण्यात परवडणारी घरे उभारणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी दिली.
म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार आहे. मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करून त्या जागी ही घरे उभारण्यात येणार आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री आपल्या पक्ष कार्यालयात जनता दरबार घेतात.
आव्हाड यांनी सोमवारी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला, यावेळी ते बोलत होते.
पूर्व उपनगरातील विक्रोळीच्या टागोर आणि कन्नमवारनगरात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोकळ्या जागा खरेदी करून त्या जागी ही घरे उभारण्यात येणार आहेत.
५६ वसाहती उभ्या केल्या
मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ट आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरे बांधता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. म्हाडाने ३० ते ४० वर्षांपूर्वी कन्नमवारनगर सारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलालनगर यांसारख्या ५६ वसाहती उभ्या केल्या असल्याचेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.