कळवा रुग्णालयात रुग्णांची माहिती मिळणार आता एका क्लिकवर
By अजित मांडके | Published: December 19, 2023 05:20 PM2023-12-19T17:20:56+5:302023-12-19T17:21:14+5:30
कळवा रुग्णालयालाही लागले डिजीटलचे वेध.
ठाणे : ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मागील काही महिन्यापासून कात टाकताना दिसत आहे. आता नव्या वर्षात येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी एकच क्रमांक देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार एखादा रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याचा आरोग्य विषयीचा पूर्व इतिहास देखील येथील डॉक्टरांना एका क्लिकवर सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्या रुग्णावर उपचार करणे देखील सोपे जाणार आहे. शिवाय त्याला कोणत्या स्वरुपाची औषधे द्यायची हे देखील यामुळे स्पष्ट होणार आहे. मोठमोठ्या खाजगी रुग्णालयात हा प्रयोग सुरु असतांना आता ठाण्यात पहिल्यांदाच कळवा रुग्णालयात हा प्रयोग केला जाणार आहे.
ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. याठिकाणी ओपीडीवर रोजच्या रोज २ हजार ते २२०० पर्यंत रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच या रुग्णालयाची क्षमता ही ५५० बेडची आहे. परंतु मधल्या काळात येथे झालेल्या मृत्युच्या तांडवानंतर रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्यानंतर या रुग्णालयात आमुलाग्र बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार येथील स्वच्छेतेला अधिक महत्व देण्यात आले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना येथील वातावरण चांगले वाटावे या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. तसेच येत्या काही दिवसात रुग्णालयाची क्षमता देखील १ हजार खाटापर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयात आल्यानंतर रुग्णांना खिडकीवर ताटकळत उभे राहण्याचा कालावधी देखील काही अंशी कमी झाला आहे. खिडक्यांची संख्या वाढविण्यात आल्याने रुग्णांना त्याचा फायदा होताना दिसत आहे.
परंतु येथे येणाऱ्या रुग्णांना आजही कागदावरच केसपेपर तयार करुन दिला जात आहे. त्यामुळे हा केसपेपर घेऊन त्याला सात ते आठ खिडक्यांवर फिरावे लागते. तसेच काही महिन्यानंतर आल्यानंतर पुन्हा नव्याने केसपेपर काढावा लागतो. त्यामुळे आधी त्याला काय आजार होतो, कशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे, किंवा रुग्णाच्या आजाराचा इतिहास रुग्णालय प्रशासनाला मिळत नव्हता. त्यामुळे रुग्णांवर देखील योग्य उपचार काही वेळेस होतांना दिसत नव्हते.
परंतु सध्याच्या हायटेक जगात रुग्णालय देखील आता हायटेक होण्याच्या तयारीत आले आहे. त्यानुसार याचा प्रयोग नव्या वर्षात करण्याचा विचार रुग्णालय प्रशासनाने सुरु केला आहे. त्यानुसार ओपीडीवर आलेल्या रुग्णांना आता एक टोकन क्रमांक दिला जाणार आहे. किंबहुना रजिस्ट्रेशन क्रमांक दिला जाणार आहे. तो रजिस्ट्रेशन क्रमांक हा त्याच्यासाठी हा शेवटपर्यंत असणार आहे. त्यानुसार तो कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी रुग्णालायत आल्यानंतर यापूर्वी त्याच्यावर कोणत्या विभागात कोणते उपचार झाले, कोणती औषधे त्याला दिली गेली, याचा इतिहास अवघ्या एका क्लिकवर रुग्णालयातील प्रत्येक विभागातील उदाहाणार्थ कान, नाक, घसा, डोळे, हृदय, आदींसह इतर विभागांना सहज उपलब्ध होणार आहे. रुग्णाला केवळ त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक लक्षात ठेवावा लागणार आहे. जेणेकरुन त्याच्यावर देखील योग्य उपचार होण्यास मदत मिळणार आहे. येत्या नव्या वर्षात हा प्रयोग महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जाणार असल्याची माहिती संबधींत विभागाने दिली आहे.