सिटी रुग्णालयाला दाखवला इंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 02:05 AM2020-08-15T02:05:31+5:302020-08-15T02:05:36+5:30
सुरक्षारक्षक घेतले काढून
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेत खाजगी रुग्णालय म्हणून सिटी हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली. या ठिकाणी शहरातील गरजूंना १० टक्के बेड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनामार्फत देण्यात आले होते. मात्र, ते आश्वासन धुळीस मिळवल्याने पालिकेने या रुग्णालयाची सुरक्षा काढून घेतली आहे. महिनाभरापासून या ठिकाणी पालिकेचे सुरक्षारक्षक तैनात होते.
अंबरनाथमधील पहिले खाजगी कोविड रुग्णालय शहरातील काही डॉक्टरांनी एकत्रित येत सिटी हॉस्पिटल येथे उभारले आहे. ७० बेडच्या या रुग्णालयात १० टक्के बेड हे पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन रुग्णालय व्यवस्थापनाने दिले होते. मात्र, यासंदर्भात कोणताही लेखी करार झाला नव्हता. त्यातच रुग्णालय सुरू झाल्यापासून या ठिकाणी पालिकेच्या रुग्णालयातील एकाही रुग्णावर मोफत उपचार करण्यात आलेले नाही. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने या खाजगी कोविड रुग्णालयाला देण्यात आलेली पालिकेची सुरक्षा काढून घेतली आहे. या रुग्णालयात ८० टक्के बेड हे सरकारी दराने उपचार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, शहरातील गरजू आणि गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा येथे उपलब्ध नाही. या रुग्णालयाला परवानगी मिळावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाने अनेक खोटी आश्वासने दिली होती. मात्र, त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता रुग्णालय प्रशासनाने केलेली नाही.
अंबरनाथ नगरपालिका चालवत असलेल्या कोविड रुग्णालयात ज्या रुग्णाची प्रकृती गंभीर होईल, अशा रुग्णावर तत्काळ आयसीयू कक्षात उपचार मिळावा, यासाठी १० टक्के बेड आरक्षित ठेवण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले होते. या रुग्णांचा औषधांचा खर्च केवळ पालिकेला करणे बंधनकारक होते, मात्र यासंदर्भातला कोणताही लेखी करार न करता आपल्या आश्वासनाला बगल देण्याचे काम रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
याठिकाणी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध होता. हा विरोध दाबण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पालिकेला सुरक्षारक्षक पुरवण्याची मागणी केली होती. पालिकेनेही रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी सुरक्षारक्षक तैनात केले होते. तीन पाळ्यांमध्ये हे सुरक्षारक्षक काम करीत होते. मात्र, या रुग्णालयात शहरातील नागरिकांवर मोफत उपचार होत नसल्याने यासंदर्भात ‘लोकमत'मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
पालिका कर्मचाऱ्यांना मिळाला पगार
अंबरनाथ : कोविडच्या कामात व्यस्त असल्याने कर्मचाºयांचा पगार काढण्याची प्रक्रिया लांबली गेली. त्यामुळे पगार वेळेत मिळाला नव्हता. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत'मध्ये येताच पालिका प्रशासनाने तत्काळ कर्मचाºयांना पगार देण्याचा निर्णय घेतला.
अंबरनाथ नगरपालिकेचे ७० टक्के कर्मचारी हे कोरोनाच्या ड्युटीवर कार्यरत आहेत. बहुसंख्य कर्मचारी आणि अधिकारी हे कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी विविध जबाबदाºयांवर काम करीत आहेत. त्यामुळे या कर्मचाºयांना आणि अधिकाºयांना आपले नियमित काम करण्यासाठी वेळच मिळत नाही. याचा पहिला फटका पालिका कर्मचाºयांना बसला.
आस्थापना विभागातील कर्मचारी कोविडच्या ड्युटीवर असल्याने कर्मचाºयांच्या पगाराची प्रक्रिया करण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी या कर्मचाºयांचा पगार लागलीच करण्याचे आदेश दिले आणि गुरुवारी या कर्मचाºयांचा पगार जमाही झाला. ८०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकाºयांना पगार मिळालेला नव्हता.
शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी जास्तीतजास्त रुग्णालये पुढे यावीत, यासाठी आमचा प्रयत्न होता. या सिटी रुग्णालयाला स्थानिकांचा विरोध असल्याने या ठिकाणी पालिकेची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, आता ही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
- प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी