वाहतूक सेना पदाधिकाऱ्याची मातंग महिलेला अमानुष मारहाण
By admin | Published: November 27, 2015 02:10 AM2015-11-27T02:10:45+5:302015-11-27T02:10:45+5:30
विजया वानखेडे या महिलेला लाकडी फळीने बेदम मारहाण करून जखमी करण्याचा निर्दयी प्रकार शिवसेनेचे पदाधिकारी दीपक आवारे यांनी केला आहे.
ठाणे : विजया वानखेडे या महिलेला लाकडी फळीने बेदम मारहाण करून जखमी करण्याचा निर्दयी प्रकार शिवसेनेचे पदाधिकारी दीपक आवारे यांनी केला आहे. वानखेडे यांचा दोष इतकाच होता की, मातंग समाजातील लोकांना घरे देतो, असे सांगून आवारे यांनी त्यांच्या भावाकडून घेतलेली रक्कम त्यांनी मागितली. राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी सामान्य नागरिकांना अशी बेदम मारहाण करीत असतानाही शिवसेनेचा कुठलाही नेता त्यावर साधी निषेधाची प्रतिक्रिया देत नाही, इतकी असहिष्णुता सध्या येथील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.
आवारे याने परेरानगर आणि भीमनगर येथील सात जणांना मातंग समाजाच्या योजनेंतर्गत घर देतो, असे सांगून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार, दोन वर्षांपूर्वी एकूण दोन लाख १० हजार रुपये आवारे याने घेतले होते. मात्र, पैसे घेऊनही घर देत नसल्याने त्याच्याकडे पैशांची मागणी होऊ लागली. याचदरम्यान विजया वानखेडे यांनीही त्यांचा भाऊ संतोष सुरळकर यांचे घेतलेले पैसे परत करण्यासाठी आवारे याच्याकडे मागणी केली. त्यानंतर, त्याने सुरळकर याचे घेतलेले ५० हजार रुपये परत केले. याचाच राग मनात धरून आवारे, त्याची पत्नी, मुलगी, मेहुणी आणि भाचा यांनी वानखेडे यांच्या घरात येऊन त्यांना लाकडी फळीने मारहाण केली असल्याचा आरोप वानखेडे यांच्या नातेवाइकांनी केला आहे. आवारे याच्या पत्नीने आपल्या पत्नीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले, असा आरोपही वानखेडे यांनी केला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. वानखेडे या सध्या शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. आवारे याच्याकडून येणाऱ्या धमक्यांबाबत सुरळकर यांनी आठ दिवसांपूर्वी शहर पोलीस आयुक्तांसह वागळे इस्टेट परिमंडळ उपायुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप वानखेडे यांच्या नातेवाइकांनी केला. तसेच घटनेचा मातंग समाजाच्या विविध संघटनांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच याप्रकरणी मारेकऱ्यांना अटक न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला. (प्रतिनिधी)
‘‘ मी कोणत्याही योजनेंतर्गत पैसे घेतलेले नाही आणि मारहाणही केलेली नाही. या घटनेच्या माध्यमातून माझ्यासारख्या समाजसेवकाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच मला फोन करून वानखेडे यांनी शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी माझी पत्नी आणि त्या महिलेमध्ये बाचाबाची झाली. ’’
- दीपक आवारे, धर्मवीर आनंद दिघे वाहतूक सेना
अध्यक्ष, रिक्षा स्टॅण्ड लोकमान्यनगर