मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 05:51 PM2017-10-08T17:51:22+5:302017-10-08T17:51:59+5:30

The initiative of Guardian Minister Eknath Shinde on the elevated road, by Mumbra Bypass | मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

मुंब्रा बायपासवर होणार एलिव्हेटेड रोड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

Next

 ठाणे – सुरुवातीपासूनच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मुंब्रा बायपासचे नष्टचर्य लवकरच संपणार असून,  रेतीबंदर ते भारत गीअर्स (वाय जंक्शन) असा मुंब्रा बायपासच्या वरून उन्नत रस्त्याचा (एलिव्हेटेड रोड) प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रायगड विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. त्याचबरोबर, सध्याच्या रस्त्याच्या संपूर्ण डागडुजीचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

पालकमंत्री  शिंदे यांच्या सूचनेनुसार रेतीबंदर ते वाय जंक्शन अशा उन्नत मार्गाचा अभ्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रायगड विभागाने केला असून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवला आहे. या मार्गाच्या बाजूने संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे. हा मार्ग झाल्यानंतर मुंब्रा बायपास मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक निर्वेधपणे सुरू राहणार असून अपघातांनाही आळा बसणार आहे. या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

त्याचबरोबर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बायपास रस्त्याच्या सर्वंकष दुरुस्तीचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार खड्डे दुरुस्ती, रस्त्याच्या वस्तीकडील बाजूने संरक्षक भिंत, गॅबियन वॉल, डिव्हायडरची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रस्त्याचे बेअरिंग बदलणे आणि दुरुस्ती, दरडी कोसळू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय यांचाही समावेश असून एकूण ८ कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात येत आहेत.

Web Title: The initiative of Guardian Minister Eknath Shinde on the elevated road, by Mumbra Bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.