नवख्या पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

By admin | Published: June 13, 2017 03:16 AM2017-06-13T03:16:33+5:302017-06-13T03:16:33+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर अनेकांना निवडणूक लढवण्याचे डोहाळे लागले आहेत. स्थानिक, विभागीय तसेच राष्ट्रीय पक्षांची

Initiative of new parties started | नवख्या पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

नवख्या पक्षांची मोर्चेबांधणी सुरू

Next

राजू काळे । लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर अनेकांना निवडणूक लढवण्याचे डोहाळे लागले आहेत. स्थानिक, विभागीय तसेच राष्ट्रीय पक्षांची शहरात नांदी असताना त्यात नवख्या पक्षांची भर पडू लागली आहे. निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू करून समितीचीदेखील स्थापना करण्यास सुरुवात केली आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये दरवेळच्या पालिका निवडणुकीसाठी स्थानिक राजकीय पक्ष वगळता इतर पक्षांचा भडिमार सुरू होत असतो. अनेकदा असे पक्ष निवडणुकीत तग धरू शकत नसले, तरी ते एका हेतूने प्रेरित होऊन निवडणूक लढवतात. कालांतराने मात्र काही नवख्या पक्षांची नोंदणीदेखील रद्द केली जाते. यंदाही पालिका निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना काही मंडळी विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून निवडणुकीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. तर, शिवसंग्रामप्रणीत भारतीय संग्राम परिषदेने यंदाच्या निवडणुकीत पदार्पण करण्याच्यादृष्टीने सुकाणू समितीची स्थापनाही केली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली परिषदेने अनेक ठिकाणच्या निवडणुका लढवल्याचा दावा केला जात आहे.
अलीकडे ठाणे पालिका निवडणुकीतही परिषदेने चांगले यश मिळवल्याचा दावा करत पुढील सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार परिषदेकडून केला जात आहे. पक्षवाढीसाठी परिषदेत इनकमिंगला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात, राष्ट्रवादीसह इतर पक्षांतील इच्छुकांनी उड्या घेतल्या आहेत. परिषदेने आगामी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असली, तरी त्याला शहरात पूरक वातावरण मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. परंतु, पक्षाचा जोरदार प्रचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील प्रत्येकावर परिषदेने जबाबदारी सोपवली आहे. परिषदेच्या संभाव्य यशासाठी शहराच्या विकासाचा अजेंडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
परिषदेप्रमाणेच आणखी काही पक्ष वा संघटना येत्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. यामुळे मतविभागणीला बळ मिळत असल्याने मतदानाचा ठोस परिणाम हाती लागत नसल्याची खंत काही स्थानिक राजकीय मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.
याप्रमाणे काही स्थानिक सामाजिक संघटनादेखील निवडणुकीत उतरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात शहरातील निर्भय भारत सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संजीव नाईक यांचे समर्थक यांनी सर्वपक्षीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याची तयारी चालवली आहे. तशी संघटनेची अधिकृत नोंदणीदेखील करण्यात आली आहे. यंदा पालिका निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.

Web Title: Initiative of new parties started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.