डाकिवलीतील तरुणांचा ‘कोरोनामुक्ती’साठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 12:22 AM2021-05-03T00:22:02+5:302021-05-03T00:22:36+5:30
रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन
वसंत भोईर
वाडा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून रुग्णांची संख्या वाढत आहे. गंभीर रुग्णांना रक्ताची तर काहींना प्लाझ्माची गरज भासते, परंतु त्याचाही तुटवडा आहे. रुग्णांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी डाकीवली येथील वीर हनुमान मित्रमंडळाचे तरुण कार्यकर्ते पुढे सरसावले आहे. त्यांनी रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन केले होते. गावातील तरुणांनी कोरोनाला हरविण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जपण्याचे डाकीवलीतील तरुणांनी ठरवले आहे. गावातील नागरिकांना मास्क लावण्याबाबत, सोशल डिस्टन्स राखण्यासाबाबत ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. गावातील रस्ते व घराघरात सॅनिटायझर फवारणी सुरू केली आहे. गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांना आपल्या परिसरातील कुडुस, वज्रेश्वरी, दाबाड, खानीवली येथील आरोग्य केंद्रावर लसीचे डोस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचण्यासाठी मोफत वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सध्या गावातील अर्ध्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या तरुण कार्यकर्त्यांनी १८ ते ४४ वयोगटातील परिसरातील नागरिकांची नोंदणी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजूंसाठी १ मे रोजी रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजिले हाेते. शनिवारी डाकीवली जि.प.शाळेत वीर हनुमान मित्रमंडळ व इंडियन मेडिकल असोसिएशन बोईसर यांच्या संयुक्त विद्यामाने हे शिबिर झाले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच स्वप्नील जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उदय पाटील, मंडळाचे अध्यक्ष नीलकंठ पाटील, मिलिंद पाटील, नंदकुमार गावळे, परेश पाटील, सागर पाटील, मोहनिश पाटील व इंडियन मेडिकल असोसिएशनचे डाॅ. तेजल पाटील, अजय डोंगरकर, शिनाद शेख उपस्थित होते. गावातील ३६ तरुणांनी रक्तदान केले. यात १६२०० मिली रक्त संकलित झाले आहे, तर दोघांनी ओ रक्तगटाचे प्लाझ्मादान केले आहे.
डाकीवली गाव परिसर कोरोनामुक्त होण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत हे उपक्रम सुरू केले असून त्याला गावातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यातील कोरोनाची लढाई आम्ही नक्कीच जिंकू.
- नीलकंठ पाटील, अध्यक्ष,
वीर हनुमान मित्रमंडळ, डाकीवली