येऊरमधील जखमी बिबट्यावर बोरीवलीतील उद्यानात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:48 PM2020-12-16T23:48:18+5:302020-12-16T23:48:37+5:30
बिबट्याच्या वावराने परिसरात घबराट : वनविभागाने घेतले ताब्यात
ठाणे : येऊरच्या जंगलामध्ये दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर जखमी बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकाने बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव बचाव केंद्रात उपचारांसाठी हलविल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.
येऊर येथे लाईट हॉटेल पाठीमागील संरक्षित क्षेत्रामध्ये १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा बिबट्या आढळला होता. तो जखमी असल्याचीही माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. ही माहिती मिळताच येऊर वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झाडीत वावर असलेल्या या बिबट्याचा तोल जात होता. काही अंतर चालून तो जागीच बसत असल्याचेही वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक दिगंबर दहिबावकर, बोरीवलीतील शीघ्र बचाव पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भारब्दे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. हे पथक येईपर्यंत रात्रीचे ९ वाजल्यामुळे काळोख पडला होता. तो पूर्णपणे शुद्धीत तसेच आक्रमक असल्याने प्रतिहल्ला करण्याचीही भीती होती. त्यामुळे रात्रीची शोधमोहीम थांबविली. त्यानंतर बुधवारी सकाळी ८ वाजता बोरीवलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भारब्दे, डॉ. पेठे आणि येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार आदी २० जणांच्या चमूने पुन्हा ती सुरू केली. सकाळी ९ वाजता हा आजारी बिबट्या झाडीत बसल्याचे आढळले. त्याची हालचाल यावेळी मंद होती. त्याला १०.३० वाजण्याच्या सुमारास ट्रँकोलायझन हे भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. प्राथमिक तपासणी करून त्याला या बचाव पथकाने ताब्यात घेतले, असे पवार म्हणाले.
येऊर पूर्व येथील वनखंड क्रमांक ११४० येथे हा आजारी बिबट्या दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर बुधवारी सकाळी मिळाला. त्याला ताप आलेला होता. त्याला आता बोरीवली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
- राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर