गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:38 IST2019-11-20T13:36:11+5:302019-11-20T13:38:25+5:30
ही इमारत रिकामी करुन तोडकाम कारवाई सुरु करण्यात आली आहे.

गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी
ठाणे - राबोडी भागातील अमर सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग खाली कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत गॅलरीतून जात असलेली महिला देखील गॅलरीसकट खाली कोसळल्याने तिला पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिला उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दुसरी एक महिला या घटनेत गॅलरी खाली जात असताना वरील बाजूस लटकत राहिली होती. तिला सुरक्षितपणे खाली काढण्यात आले आहे. ही इमारत रिकामी करुन तोडकाम कारवाई सुरु करण्यात आली आहे.
या घटनेत सुरय्या अक्रम शेख (45) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. राबोडी भागातील अमर सदन ही इमारत तळ अधिक दोन मजल्यांची असून ती 45 वर्षे जुनी आहे. या इमारतीत 16 फ्लॅट्स आहेत. परंतु ही इमारती धोकादायक झाल्याने या इमारतीमध्ये तीन ते चार रहिवासी वास्तव्याला होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुरय्या शेख ही महिला दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून जात होती. तर जैनब रियाज शेख (45) ही महिला सुध्दा त्याठिकाणी उभी होती. त्याचवेळेस गॅलरीचा भाग खाली कोसळला, त्यामध्ये सुरय्या देखील खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.