वाहनांची चोरी करणारा सराईत अडकला पोलिसांच्या जाळ्यात
By जितेंद्र कालेकर | Published: February 20, 2023 10:11 PM2023-02-20T22:11:00+5:302023-02-20T22:11:40+5:30
कळवा पोलिसांची सात गुन्ह्यांची उकल, अडीच लाखांची सात वाहने हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाहन चोरी करणाऱ्या मोहमद इरफान सागीर शेख (२५, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून पाच मोटारसायकली आणि दोन रिक्षा, अशी दोन लाख ४७ हजारांची सात वाहने हस्तगत करण्यात आली.
कळव्यातील श्रीजी धाम सोसायटीच्या बाजूला असलेल्या सहकार बाजाराजवळ खारीगाव येथील रहिवाशाची मोटारसायकल १३ फेब्रुवारीला रात्री चोरीला गेल्याची तक्रार कळवा पोलिस ठाण्यात १४ फेब्रुवारीला दाखल झाली होती. घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही चित्रण तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित चोरटा हा मुंब्य्रातील अमृतनगर भागातील असल्याची माहिती पोलिस हवालदार श्रीमंत राठोड यांना मिळाली.
त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक दीपक घुगे, हवालदार रमेश पाटील, माधव दराडे, शहाजी एडके आणि राहुल पवार आदींच्या पथकाने १४ फेब्रुवारीला मुंब्रा भागात सापळा लावून मोहमद इरफान शेख याला अटक केली. चौकशीमध्ये त्याने कळवा आणि मुंब्रा परिसरात सात ठिकाणी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून दोन रिक्षांसह पाच वाहने हस्तगत केल्याची माहिती उपायुक्त गावडे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"