ठेकेदारांच्या ‘भेटीगाठीं’ची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:47 AM2018-07-20T01:47:26+5:302018-07-20T01:48:23+5:30
स्थायी समिती ही विकासकामे करणारी समिती नसून ती कलेक्शन कमिटी असल्याच्या प्रतिक्रिया ठाणेकरांनी नोंदवल्या आहेत.
ठाणे : स्थायी समिती ही विकासकामे करणारी समिती नसून ती कलेक्शन कमिटी असल्याच्या प्रतिक्रिया ठाणेकरांनी नोंदवल्या आहेत. स्थायी समिती सभापतींच्या पीएकडून ठेकेदारांना केलेल्या फोन प्रकरणावरून ठाणेकर संतापले आहेत. यापूर्वी केवळ चर्चा सुरू होती. आता तर चक्क ‘भेटीगाठी’साठी फोन करण्यात येत आहेत, हे लाज सोडल्याचे लक्षण असून याची चौकशी करण्याची मागणी ठाणेकरांनी केली आहे.
सभापतींच्या पीएकडून काही ठेकेदारांना भेटीगाठींसाठी फोन करण्यात आले होते. विकासकामांची माहिती घेण्यासाठी ठेकेदारांना बोलावल्याची प्रतिक्रिया सभापतींनी दिली. विकासकामांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेणे अपेक्षित होते. ठेकेदारांना बोलवायची गरजच काय, असा सवाल ठाणेकर करत आहेत.
अधिका-यांशिवाय डाळ शिजणे अशक्य
स्थायी समितीची गरजच कशासाठी, असा सवाल करून काहींनी ती बंद करण्याची मागणी केली. यापूर्वी वर्षभर ही समिती गठीत झाली नव्हती. तेव्हा विकासकामे झाली नाहीत का, असा सवाल ठाणेकरांनी केला आहे. यामध्ये केवळ लोकप्रतिनिधींची साखळी आहे, असे म्हणता येणार नाही, तर यात काही अधिकारीही सहभागी असू शकतात. त्यांच्या सहभागाशिवाय ही डाळ शिजूच शकणार नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. आता सभापतींनीच आपण कोणत्या विकासकामांची माहिती घेतली, हे जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया करदात्या ठाणेकरांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेची स्थायी समिती ही अंडरस्टँडिंग समिती असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनीच केला आहे. त्यात आता ठाणे महापालिकेतील समिती त्याच पद्धतीने कारभार करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यापूर्वी महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत नंदलाल समिती नेमली होती. त्या घोटाळ्याचे काय झाले. १८ वर्षे उलटून गेली तरी एकालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे आजही आमचे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही, असा ग्रह केलेल्या या मंडळींची कातडी गेंड्याची झाली आहे.
-नितीन देशपांडे
मुळात विकासकामांची माहिती ही पालिकेतील अधिकारी देऊ शकतात की ठेकेदार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सभापतींच्या अशा उत्तरामुळे नक्कीच शंका उपस्थित होऊ शकतात.
- स्नेहलता पवार
यापूर्वी ठाणे महापालिकेत विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. अनेक घोटाळ्यांची चौकशी लागली. त्यात अनेक लोकप्रतिनिधींसह अधिकाºयांवर ठपके ठेवण्यात आले. त्यांचे पुढे काहीच झाले नाही, त्यामुळेच आजही अशा प्रकारे स्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंग होत आहे.
- रवी जडे