ठाण्यात सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचा केवळ फार्स
By अजित मांडके | Published: April 3, 2023 05:55 PM2023-04-03T17:55:59+5:302023-04-03T17:57:02+5:30
जे शासनाकडून आलेले सहाय्यक आयुक्त होते, त्यांची चौकशी शासनामार्फत सुरु आहे. तर उर्वरीतांची चौकशी ही महापालिकेमार्फत सुरु आहे.
ठाणे : अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन महापालिकेतील १४ आजी, माजी सहाय्यक आयुक्तांची दोन वर्षापूर्वी चौकशी लावण्यात आली होती. मात्र दोन वर्षानंतर देखील अद्यापही त्या चौकशीची काय झाले, याचे उत्तर पालिका अधिकाºयांकडे नाही. केवळ चौकशी सुरु असल्याचेच उत्तर दिले जात असून केवळ तारीख पे तारीखच यासाठी दिली जात आहे. एकूणच यात केवळ चौकशीचा फार्सच केला जात असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या आड ठाण्यातील विविध भागात अनाधिकृत बांधकामांचा भस्मासुर वाढल्याचे दिसून आले होते. त्यानंतर कोरोना र्निबध शिथील झाल्यानंतर याच मुद्यावरुन दोन वर्षांपूर्वी स्थायी समिती, महासभेत गदारोळ झाला होता. परंतु ज्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यकाळात अनाधिकृत बांधकामे झाले असतील अशा सर्वच आजी, माजी सहाय्यक आयुक्तांची चौकशी करुन कारवाई करावी असा ठरावही झाला होता. त्यानंतर मागील वर्षभरापासून या सहाय्यक आयुक्तांची चौकशी समिती मार्फत चौकशी सुरु आहे. जे शासनाकडून आलेले सहाय्यक आयुक्त होते, त्यांची चौकशी शासनामार्फत सुरु आहे. तर उर्वरीतांची चौकशी ही महापालिकेमार्फत सुरु आहे.
मात्र चौकशी समिती स्थापन करून दोन वर्षांचा कालावधी उलटूनही या चौकशी समितीने अद्याप कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही. नेमकी या चौकशीस समितीचे झाले काय याची माहिती घेण्याचा प्रयन्त केल्यानंतर अजूनही चौकशीसाठी तारीख पे तारीखच मिळत असून केवळ सहाय्यक आयुक्तांची बाजू ऐकून घेण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महापालिका आणि शासन स्तरावर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचे नेमके चालले काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दोन वर्षांपासून केवळ या सहाय्यक आयुक्तांची चौकशीच सुरु असून दुसरीकडे या कालावधीत विशेष करून कळवा प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. तसेच अजूनही काही भागात ही बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे या चौकशीमधून साध्य काय होणार आहे असा प्रश्नही निर्माण झाला आहे.