कोरोना रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 12:15 AM2020-09-30T00:15:02+5:302020-09-30T00:15:09+5:30
पाल हे कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे तेथील डीनकडे हे प्रकरण पाठवून, या चौकशीत जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निष्काळजीमुळे जीव गमवावा लागलेल्या एका ५९ वर्षीय कोरोना रुग्णाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही होईल, असे पालिकेने सांगितले.
भिवंडी येथे राहणारे वासुदेव पाल यांचा कोरोना चाचणीचा अहवाल कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाने तीन दिवसांनी, म्हणजेच ९ सप्टेंबरला त्यांच्या नातेवाइकांना दिला. पाल यांच्या नातेवाइकांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही बाळकूम येथील कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले जात नव्हते. अखेर १३ सप्टेंबरला दाखल केल्यावर १२ तासांत ते दगावले होते. याबाबत मनसेनेही दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांचे जावई अखिलेश पाल यांनीही सोमवारी आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांना तक्रार अर्ज देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार याबाबत ठाणे महापालिकेने चौकशीचे पाऊल उचलले आहे.
पाल हे कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे तेथील डीनकडे हे प्रकरण पाठवून, या चौकशीत जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - डॉ. राजू मुरूडकर, आरोग्य अधिकारी, ठाणे मनपा चौकशीसाठी डॉ. मुरुडकर यांनी २० ते २५ दिवस लागतील, असे सांगितले आहे. माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूस पालिकेचे अधिकारी-कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळे २० ते २५ दिवस हा खूप मोठा कालावधी आहे. खरेतर, पालिकेने तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे.
- अखिलेश पाल, मृताचे नातेवाईक