आठ रस्त्यांच्या कामातील खर्चाची चौकशी; कोकण विभागीय आयुक्त महिनाभरात देणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:44 PM2020-11-09T23:44:46+5:302020-11-10T09:18:29+5:30
मीरा-भाईंदरमधील कामे
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने अल्ट्रा व्हाइट थिन टॉपिंग अर्थात यूटीडब्ल्यूटी पद्धतीने आठ रस्त्यांसाठी अंदाजित खर्चापेक्षा तब्बल १६ कोटी ९५ लाख ६० हजार रुपये इतक्या जास्त दराने दिलेले ठेके आणि रस्त्यांच्या कामांचा निकृष्ट दर्जा, याच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी महिनाभरात आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करायचा आहे. सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का असून `लोकमत`ने सदर रस्त्यांबाबत बातमी दिल्यावर आ. प्रताप सरनाईक यांनी शासनाला पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती.
अल्ट्रा व्हाइट थिन टॉपिंग अर्थात यूटीडब्ल्यूटी पद्धतीने कमी खर्चात व कमी वेळेत रस्ते टिकाऊ बनवण्यात येत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महापालिकेने केला होता. प्रत्यक्षात पालिकेनेच तयार केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा तब्बल ३० टक्के जास्त दराने ठेके दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कामांची मुदत संपूनदेखील बहुतांश रस्ते वेळेत पूर्ण केले नाहीत.भाईंदर पूर्व, स्व. प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरीपर्यंतच्या रस्त्याचे काम २९.९० टक्के जास्त दराने रिद्धिका एंटरप्रायझेसला दिले. सिल्व्हर पार्क ते सृष्टी रस्त्याचे काम देव इंजिनीअर्सला २९.६० टक्के जास्त दराने दिले गेले.
मीरा रोड पूर्व, साईबाबानगर ते शीतलनगर रस्त्याचे काम २३.५० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शनला दिले. शांतीनगर सर्कल ते नयानगर पोलीस चौकी रस्त्याचे काम २५.३० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शनला दिले. नरेंद्र पार्क ते उड्डाणपूलपर्यंतच्या रस्त्याचे काम २८.५० टक्के जास्त दराने श्रीजी कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. मीरा रोड रेल्वेस्थानक ते भक्तिवेदान्त रस्त्याचे काम सुमारे ३० टक्क्यांनी वाढवून गजानन कन्स्ट्रक्शनला दिले.
भाईंदर पूर्वेचे पालिका क्रीडासंकुल ते ७११ हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याचे काम २२.६५ टक्के जास्त दराने गजानन कन्स्ट्रक्शनला दिले गेले. तर, दीपक रुग्णालय ते सेव्हन इलेव्हन शाळेपर्यंतच्या रस्त्याचे काम २९.९० टक्के जास्त दराने ए.आय.सी. इन्फ्रास्ट्रक्चरला दिले आहे.
या आठ रस्त्यांच्या कामांसाठी पालिका अंदाजपत्रकानुसार ६२ कोटी ८३ लाख ३१ हजार ४८८ रुपये इतका खर्च अपेक्षित होता. परंतु, प्रत्यक्षात पालिकेने ठेकेदारांना तब्बल १६ कोटी ९५ लाख ५९ हजार ५३६ वाढवून दिल्याने रस्त्यांच्या कामांचा खर्च तब्बल ७९ कोटी ७८ लाख ९१ हजार इतका झाला.
इतके जास्त पैसे देऊनदेखील कामे रखडली. शिवाय, रस्त्यांना ठिकठिकाणी तडे गेले. वरचे सिमेंट उडाले आहे. रस्त्याचा समतोल साधलेला नाही. मुख्य नाके-चौक या ठिकाणी सिमेंटऐवजी डांबरीकरण केले आहे. एकूणच कामात तांत्रिक बाबी व साहित्याचा दर्जा आदी मध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप होत होते.
लोकमतने या बाबतचे वृत्त देताच प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारी करून ८ रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. सरनाईक यांनी या प्रकरणी शासनाकडे पाठपुरावा चालवला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील सदर रस्ते कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत शासनकडून चौकशी लावणार असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते.
शासनाने देखील सरनाईक यांनी केलेल्या रस्ते कामातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. अवर सचिव नवनाथ वाठ यांनी पत्र काढून कोकण विभागीय आयुक्तांकडे चौकशी सोपवली आहे. कोकण आयुक्तांनी एका महिन्याच्या आत या रस्ते कामांची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्यास कळवले आहे. तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना देखील या प्रकरणातील सर्व कागदपत्रे कोकण विभागीय आयुक्तांना देण्याचे निर्देश दिले आहेत.