गावदेवी भूमिगत पार्किंगच्या कामाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:29 AM2020-10-02T00:29:17+5:302020-10-02T00:29:28+5:30
आयुक्तांनी दिल्या सूचना : काँगे्रसने घेतली भेट, प्रकल्प अडचणीत सापडण्याची शक्यता
ठाणे : गावदेवी मैदानाखाली सुरूअसलेल्या भूमिगत पार्किंगच्या कामाबाबत खुद्द स्मार्ट सिटी लि.च्या सल्लागार समितीमधील सदस्या सुलक्षणा महाजन यांनीच आक्षेप घेतला आहे. त्यानंतर, काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिनकुमार शर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयुक्तांनी या कामाची चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे गावदेवी मैदानाखाली सुरूअसलेल्या पार्किंग प्लाझा कामाच्या अडचणी वाढणार असल्याचेच दिसत आहे.
स्मार्ट सिटीच्या सल्लागार सुलक्षणा महाजन या नगररचनातज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही आक्षेप घेतले आहेत, ते आता योग्य आहेत, असेच दिसत आहे. मुळात हे काम करताना सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. १०० ते १५० गाड्यांकरिता एवढा कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाचा नेमका उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यामुळे किमान या बाबींचा तरी विचार केल्यास पालिकेचे आर्थिक नुकसान तर होणार आहेच, शिवाय भविष्यात येथील आजूबाजूच्या इमारतींनादेखील धोका संभवू शकणार आहे. तसेच बाजूला ठाणे महापालिकेचा जलकुंभदेखील आहे. त्यालाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत जाधव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.
पालिकेचा फायदा काय?
भूमिगत पार्किंगचा प्रकल्पाचे काम सुरु करण्यापूर्वी रहिवाशांना विश्वासात घेतले नाही. या प्रकल्पाने पालिकेला काय फायदा होणार, याचाही आढावा घेतला नाही.