वाहन चालवताना घाला हेल्मेट अन् करा मोबाइल चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:47 AM2018-04-17T02:47:18+5:302018-04-17T02:47:18+5:30
देशात रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणारांची संख्या अधिक आहे. हीच बाब गांभीर्याने घेत अपघात टाळण्यासाठी डोंबिवलीतील वाहतूक विभागाने नुकतीच हेल्मेटसक्ती केली होती. मात्र, त्याला विरोध झाल्याने ती बारगळली.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : देशात रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणारांची संख्या अधिक आहे. हीच बाब गांभीर्याने घेत अपघात टाळण्यासाठी डोंबिवलीतील वाहतूक विभागाने नुकतीच हेल्मेटसक्ती केली होती. मात्र, त्याला विरोध झाल्याने ती बारगळली. पण, आता हेल्मेट घातल्यावर जीवाच्या सुरक्षेबरोबरच मोबाइलही चार्ज करणे शक्य होणार आहे. मुंब्रा येथील ज्ञानदीप विद्यामंदिरातील शिक्षक हेमंत नेहेते यांनी सहकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने सोलर हेल्मेट विकसित केले आहे.
सुरक्षित प्रवासासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. एका खाजगी कंपनीच्या सर्वेक्षणानुसार ५७ टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. मागील दशकात अपघाती मृत्यूंचे प्रमाण ५४.२ टक्क्यांनी वाढले आहे. २०१६ मध्ये रस्ते अपघातांत एक लाख ५१ हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्यातील ६० नागरिक १८ ते ४५ या वयोगटांतील होते. अपघातांमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण तीन टक्के आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सोलर मोबाइल चार्जर (स्मार्ट हेल्मेट) विकसित करण्याची कल्पना सुचल्याचे नेहेते यांनी सांगितले.
नेहेते म्हणाले, ‘अॅण्ड्राइड मोबाइल वापरणारांची संख्या अधिक आहे. पण, इंटरनेटवापरामुळे मोबाइलची बॅटरी लवकर संपते. चार्जिंगची सुविधा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतेच, असे नाही. त्यामुळे हेल्मेट आणि मोबाइल चार्जर विकसित करण्याची कल्पना सुचली. सोलर प्लेटचा वापर या स्मार्ट हेल्मेटमध्ये केला आहे. त्यामुळे वाहन चालवताना मोबाइलची बॅटरी चार्ज करता येते. तसेच गाडी खुल्या पार्किंगमध्ये लावल्यास तेथेही बॅटरी चॉर्ज होऊ शकते. त्यामुळे दुचाकीस्वार मोबाइल चार्जिंगसाठी का होईना हेल्मेट वापरतील, असे नेहेते म्हणाले.
स्मार्ट हेल्मेट प्रकल्पाचे सादरीकरण इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी ईश्वरी पाटील हिने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात केले होते. त्यावेळी तिने सोलर प्लेटसोबत एक अॅल्युमिनियमची चौकट या हेल्मेटमध्ये लावली होती. परंतु, अपघातात ती प्लेट चालकाला लागू शकते, अशी शंका काहींनी उपस्थित केली. या प्रदर्शनात प्रकल्पाने प्रथम क्रमांकाची बाजी मारली. जिल्हास्तरीय प्रदर्शनात दोन सोलर प्लेट बसवल्या. यातही प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मात्र, राज्यस्तरीय प्रदर्शनात या हेल्मेटमध्ये बदल करण्यात आला. या वेळी छोटछोट्या ३० ट्युब वापरण्यात आल्या. या ट्युब वायरने एकमेकींना जोडण्यात आल्या. यातून इनपुट ३.७ ते ६ होल्ड डीसी मिळत होते. मोबाइल चार्जिंगसाठी पाच होल्ड डीसी इतक्या ऊर्जेची गरज असते. संतुलन प्रमाणात मोबाइल चार्जिंग होत होता. मोबाइल चार्ज करताना त्याचा स्फोट होणार नाही, याची काळजी घेतली आहे. विज्ञान प्रकल्पासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई, सचिव समीर देसाई, शिवानी देसाई, प्रवीणा देसाई, मुख्याध्यापिका उषा शिंदे, शिक्षक नंदकिशोर चौधरी यांचे सहकार्य लाभले.
राज्यस्तरीय प्रदर्शनात महाराष्ट्रातून १२७ प्रकल्प सादर झाले. त्यातून आठ पारितोषिके देण्यात आली. त्यामुळे या प्रदर्शनात यश थोडेसे हुकले असले, तरी आम्ही थांबणार नाही. ‘इन्स्टायर’ या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावर जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नेहेते यांनी सांगितले. शाळेने यापूर्वी अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत हा प्रकल्प राष्ट्रीयस्तरावर नेला आहे. तसेच भ्रमणध्वनीद्वारे जलसंवर्धन व जलसिंचन हाही प्रकल्प मांडला आहे.
आपत्कालीन बटण
स्मार्ट हेल्मेटला एक बटण बसवले आहे. हेल्मेट वापरकर्ते अडचणीच्या वेळी त्याचा वापर करू शकतात. हे बटण दाबल्यास पोलिसांच्या गाडीप्रमाणे सायरन वाजतो. त्यामुळे चालक अडचणीत असल्याचे अन्य नागरिकांना समजून ते मदतीला येतील, असे नेहेते म्हणाले.
सुटीच्या दिवशी गॅलरीत हेल्मेट ठेवूनही मोबाइल चार्जिंग करता येऊ शकतो. मोबाइल चार्जिंगसाठी एक ते दीड युनिट वीज लागते. त्यामुळे दिवसाला पाच रुपये याप्रमाणे महिन्याची १५० रुपयांची बचत होऊ शकते.
हेल्मेटसाठीचा खर्च : हेल्मेट बाजारातून ४०० रुपयांना विकत घेतले आहे. त्यावर सोलर सिस्टीम बसवण्यासाठी ६०० रुपये खर्च आला. त्यामुळे साधारण एक हजारात हे स्मार्ट हेल्मेट उपलब्ध होऊ शकते.