मानसिक दबाव आणून वाममार्गाला लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:30 AM2018-05-25T04:30:15+5:302018-05-25T04:30:15+5:30
पोलिसांमुळे सुटका : पीडित मुलीचे कथन
ठाणे : मानसिक दबाव आणून त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या महिलांची प्रवृत्ती दोन दुर्दैवी मुलींच्या जबाबातून उघडकीस आली आहे. ठाणे पोलिसांनी एका कारवाईमध्ये या मुलींची आठ दिवसांपूर्वी सुटका केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कळवा येथील मनीषनगरातील एका सोसायटीमध्ये १५ मे रोजी धाड टाकली. यावेळी गोरगरीब मुलींना अनैतिक कामासाठी वापरणाºया तिघींना अटक करण्यात आली. त्यांच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींसह चार पीडित मुलींची सुटकाही पोलिसांनी केली. त्यापैकी दोन मुलींनी त्यांची आपबिती पोलिसांसमोर कथन केली.
दीपाली आणि कविता (नावे बदलली आहेत) या सहा महिन्यांपूर्वी सायन येथे घरकामासाठी जायच्या. एक दिवस घराजवळच्या बसथांब्यावर दीपालीची ओळख ममता नामक महिलेशी झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल नंबरही यावेळी घेतले. चार महिन्यांपूर्वी दीपाली आणि कविताचे घरकाम बंद झाले. १५ दिवसांपूर्वी दीपालीला ममताचा फोन आला. चांगल्या पगाराचे आमिष दाखवून तिने कळवा येथील एका सोसायटीमध्ये मैत्रिणीला घेऊन येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे दीपाली आणि कविता तिला भेटण्यासाठी गेल्या असता, तिथे चार महिला अगोदरच होत्या. त्यावेळी ममताने परपुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचे चांगले पैसे मिळतील, असे दीपाली आणि कविताला सांगितले. या प्रकारामुळे हादरलेल्या दोन्ही मैत्रिणींनी स्पष्ट नकार दिला. मात्र, ममता आणि तिच्या तीन मैत्रिणींनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला; दोघींना धमक्याही दिल्या.
त्यांच्या दबावाला दोन्ही मैत्रिणी बळी पडल्या. त्यानंतर, ममता सतत दीपालीला फोन करायची. त्याला कंटाळून दीपालीने ममताचा मोबाइल नंबर ब्लॉक केला. त्यानंतर, ममताने दुसºया नंबरवरून फोन करून सर्व प्रकार घरच्या लोकांना सांगण्याची धमकी दीपालीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या दीपाली आणि कविता या दुष्टचक्रात अडकल्या.
अखेर दुष्टचक्रातून सुटका
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी कारवाई करून या चार महिलांना बेड्या ठोकल्या. यामुळे दीपाली आणि कविताने सुटकेचा नि:श्वास टाकला.