संच मान्यतेला आवर घाला : शिक्षकांचे मोतेंना साकडे
By admin | Published: February 1, 2016 01:11 AM2016-02-01T01:11:10+5:302016-02-01T01:11:10+5:30
राज्याच्या शिक्षण विभागात सध्या संच मान्यता विषयक नवीन रचना करण्याचे काम सुरू असून यामुळे सर्व शाळांतून १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी अशी रचना करून त्यानुसार शिक्षक
वाडा : राज्याच्या शिक्षण विभागात सध्या संच मान्यता विषयक नवीन रचना करण्याचे काम सुरू असून यामुळे सर्व शाळांतून १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी अशी रचना करून त्यानुसार शिक्षक पदांची रचना केली जाणार आहे. या पटानुसार अनेक शिक्षकांची उचलबांगडी होणार असल्याने शिक्षकात घबराट असून या संच मान्यतेला आवरा, असे साकडे शिक्षकांनी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना घातले आहे.
राज्य सरकारने शिक्षण विभागात प्रगत शिक्षणाची घोषणा करीत प्राथमिक शिक्षणात आर टी ई नुसार १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी असे प्राथमिक शिक्षणाचे दोन विभाग करून त्या पटनिश्चीतीप्रमाणे मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांच्या संचमान्यतेनुसार नेमणुका केल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.या मुळे सध्या असलेली मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकपदे रद्द होणार असून अशा शिक्षकांना अन्य शाळांत जावे लागेल. यामुळे अनेक मुख्याध्यापक व शिक्षक कमी होणार आहेत .पूर्वी १ ली ते ७ वी इयत्तेच्या शाळेवर पटाचा विचार न करता मुख्याध्यापक पद देण्यात येत असे. हे मुख्याध्यापक वर्ग अद्यापनासह शालेयव्यवस्थापन सांभाळीत असत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये रोज नवीन येणाऱ्या परिपत्रकामुळे मुख्याध्यापकाचे काम वाढले आहे.मुख्याध्यापक पद आवश्यक असतांना पटाचीअट घातल्याने अनेक शाळातून ही पदे रद्द होणार आहेत. इंग्रजी शाळांचे पेव गावोगावी झाल्याने मराठी शाळांची पटसंख्या कमी होत आहे. याचा विचार न करता मुख्याध्यापक पदाला कात्री लावली जात आहे असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
पूर्वीच्या संरचनेनुसार १ ली ते ७ वी किंवा नवीन रचनेनुसार १ ली ते ८ वी चा पट १५० विद्यार्थी असतील तर तेथे मुख्याध्यापक पद भरले जात होते.