झोपण्यापूर्वी अति टीव्ही, मोबाईल बघण्याने निद्रानाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:03+5:302021-06-27T04:26:03+5:30

अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : माेबाईल, टीव्हीवर सतत वेगवेगळी दृश्ये, व्हिडिओ पाहून मनावर ताण येताे. मेंदू ...

Insomnia from watching too much TV, mobile before going to bed | झोपण्यापूर्वी अति टीव्ही, मोबाईल बघण्याने निद्रानाश

झोपण्यापूर्वी अति टीव्ही, मोबाईल बघण्याने निद्रानाश

Next

अनिकेत घमंडी : लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : माेबाईल, टीव्हीवर सतत वेगवेगळी दृश्ये, व्हिडिओ पाहून मनावर ताण येताे. मेंदू सतत त्याच गोष्टींचा विचार करत राहताे. त्यामुळे निद्रानाश विकार होऊ शकतो. निद्रानाशामुळे नागरिकांच्या जीवनावर भविष्यात विविध दुष्परिणाम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी दिवसाचे पूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे. ठरावीक वेळी झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय लावल्यास त्याचा आराेग्यावर चांगला परिणाम दिसून येताे, असे मत निद्राविकाराबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.

सध्याची जीवनशैली पूर्णत: बदललेली आहे. सतत धावपळीच्या आयुष्यामुळे जीवनातील अनेक अत्यावश्यक सवयींना तिलांजली द्यावी लागते. मैदानी खेळ कमी झाले असून, त्यांची जागा आता माेबाईल, टीव्ही यांनी व्यापली आहे. सतत स्क्रीनकडे पाहत बसल्यामुळे मनावर ताण येताे. झाेपण्यापूर्वी माेबाईल, टीव्ही पाहिल्यामुळे त्यावरील दृश्ये मन विचलित करून अस्वस्थता निर्माण करतात. अशी सवय असलेले नागरिक म्हणायला झाेपण्यासाठी अंथरुणावर देह ठेवतात; मात्र त्यांच्या मनात सतत काही ना काही विचार सुरू असतात. त्यांचा मेंदू कार्यरत असतो. त्यामुळे चिंता, काळजी वाढून न भरून येणारी हानी होते. काही वर्षांत निद्रानाश विकार जडलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

---------------

झोप का उडते?

- खूप चिंता केल्याने

- सतत विचार केल्याने

- जास्त काळजी केल्याने

- चहा, कॉफीचे अति सेवन केल्याने

- मोबाईल, टीव्ही जास्त वेळ बघितल्याने

- वेळेचे नियोजन न केल्याने

- सतत अंथरुणावर पडून व्यावहारिक बाबी केल्याने

-----------------------

कोणत्या वयोगटात किती झोप आवश्यक

शून्य ते ३ वर्षे : १६ ते १९ तास

५ ते ८ वर्षे : सुमारे १२ तास

९ ते १८ : सुमारे १० तास

त्यानंतर ४५ वर्षांपर्यंत : ८ तास

ज्येष्ठांपर्यंत : ६ ते ८ तास

---------------------------

झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम

- स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो

- आरोग्यावर विपरीत परिणाम

- पित्त वाढीस लागते

- चिडचिडेपणा, अस्वस्थता

- मरगळ, निरुत्साह, त्यामुळे दैनंदिन कामावर प्रभाव

----------------------

झोपेची गोळी शक्यतोवर नकोच

निद्रानाश झाला असला तरीही शक्यतो झोपेच्या गोळीकडे जाऊच नये. त्याची सवय लागणे चांगले नाही. त्याचा परिणाम शरीरावर होतो. गोळीच्या पर्यायाकडे जाण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे, अन्यथा सवय लागली की स्वतःहून झोप येण्याचे प्रमाण कमी होते. गोळी घेणे हीच मानसिकता होते. त्याशिवाय काहीच हाेणार नाही असे मनाने ठरवल्यास रुग्णाला त्याचे ॲडिक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

चांगली झोप येण्यासाठी काय करावे

चांगली झाेप येण्यासाठी किमान दोन तास आधी मोबाईल व टीव्ही बघणे टाळावे, सतत अंथरुणावर बसून व्यवहार करणे टाळावे, ठराविक वेळीच अंथरुणावर जावे, झोपेचे, उठण्याचे नियोजन करावे, शक्यतोवर संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा उत्तेजक पदार्थ सेवन करणे टाळावे. संगीत निश्चितच ऐकावे. झोपण्याच्या खोलीतील दिवा मंद करावा. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करावी. मनात कोणताही विचार, तणाव न आणता झोपण्याचा प्रयत्न करावा.

- विजय चिंचोले, मानसोपचारतज्ज्ञ, डोंबिवली.

Web Title: Insomnia from watching too much TV, mobile before going to bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.