महाआवास अभियानांतर्गत बांधकाम सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:24+5:302021-01-16T04:44:24+5:30
ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या योजना गतिमान करण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत ‘महाआवास’ अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यात ...
ठाणे : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या योजना गतिमान करण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत ‘महाआवास’ अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यात या योजनेखाली सुरू असलेल्या घरकुलांच्या बांधकामाची पाहणी ठाणे जिल्हा परिषदेकडून सध्या सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते व उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी संयुक्त दौरा करून गुरुवारी मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावातील घरकुलांची पाहणी केली. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.
जिल्ह्यात या योजनेखाली एक हजार ५८७ घरकुले बांधण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर या पाचही तालुक्यांत ही घरकुले उभी राहात आहेत. डॉ. सातपुते आणि पवार यांनी दौऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला. ज्या घरांची बांधकामे सुरू आहेत, ती दिलेल्या वेळेत बांधण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतींना दिल्या.
महाआवास अभियानांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून महिला बचतगटांच्या महासंघामार्फत घरकुल मार्ट उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली व ग्रामीण विकास विभागाला सूचना केल्या. तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी वनराई बंधारे, बचतगटातील महिला सदस्यांनी तयार केलेली पोषण परसबाग, जि.प. सेस फंडातून कृषी विभाग राबवत असलेली औजारे बँक आदींची पाहणी केली. यावेळी मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, कोरावळेचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ, तसेच जि. ग्रा. वि. यंत्रणा ठाणे, ग्रामीण जीवन उन्नती अभियान, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
.............