उल्हासनगरातील विकास कामाची आयुक्तांकडून पाहणी; ठेकेदार, सल्लागार उपस्थित
By सदानंद नाईक | Published: March 29, 2024 07:05 PM2024-03-29T19:05:32+5:302024-03-29T19:06:57+5:30
उल्हासनगरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजने अंतर्गत गटारीचे पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.
उल्हासनगर : महापालिका हद्दीतील विविध विकास कामाची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी करून ठेकेदार व सल्लागाराना कामाविषयी सूचना केल्या आहेत. यावेळी शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह ठेकेदार व सल्लागार उपस्थित होते.
उल्हासनगरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजने अंतर्गत गटारीचे पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. खोदलेले रस्ते दुरस्त केले जात नसल्याने, वाढत्या धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारीत वाढ झाली. तसेच अर्धा फुटाच्या गटार पाईप मधून सांडपाणी वाहून जाणार का? असा प्रश्न उपस्थित करून योजनेवर नागरिकांनी प्रश्नचिन्हे निर्माण केले. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी विकास कामाचे ठेकेदार, सल्लागार यांच्या समवेत विकास कामाची पाहणी केली. पाहणी वेळी शहर अभियंता संदीप जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
शहरातील बजरंग आईस फॅक्टरी येथील रस्त्याचे काम, मच्छी मार्केट येथील मूलभूत सुविधेचे अंतर्गतील विविध विकास कामे, राधास्वामी सत्संग येथील भुयारी गटार ड्रेनेज लाईन, पवई चौक येथील खोदलेल्या रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, रस्त्याचे काम व त्याचा दर्जा आदींची पाहणी केली. या विकास कामा व्यतिरिक्त शहरातील विविध रस्त्याचे काम, मूलभूत सुखसुविधा, साफसफाई, भुयारी गटार ड्रेनेज लाईन आदी कामाची पाहणी आयुक्तांनी करून संबंधित ठेकेदार व कामाचे सल्लागार यांना आयुक्त अजीज शेख यांनी सूचना केल्या आहेत.
भुयारी गटारीच्या कामावर शहरातून टीका होत असल्याने, सल्लागाराच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. यापूर्वी राबविलेली ३५० कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेवर व सल्लागारावर अशीच टीका झाली होती. ४२३ कोटींची भुयारी गटार योजनेचे सल्लागार कुठेच दिसत नसल्याचा आरोप विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला असून १२६ कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील योजनेच्या सल्लागाराबाबत आताच महापालिकेने दक्षता घेण्याची सूचना केली जात आहे.
विकास कामावर नजर- आयुक्त अजीज शेख
शहरातील विकास कामात अनियमितता व निकृष्ट काम आढळल्यास कारवाई करणार आहे. याबाबत संबंधित ठेकेदार व सल्लागाराना सूचना दिल्या असून विकास कामाची पाहणी वेळोवेळी करणार आहे.